घाटी रुग्णालयाला निवासी डॉक्टरांची प्रतीक्षा

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : घाटीमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. मागील वर्षानुवर्षे ही रिक्त पदे भरण्याची मागणी घाटी प्रशासन आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे प्रत्येक सरकारने डोळे झाक केल्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश मधून घाटीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. यामुळे काही दिवसापूर्वी मार्डच्या डॉक्टरांनी राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांची १,४३२ पदे भरण्याबाबत आंदोलन करत संप पुकारला होता. याची दखल घेऊन राज्य शासनाने या जागा रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले मात्र अद्यापही भरती न झाल्याने ७५ निवासी डॉक्टर मिळण्याची घाटीला प्रतीक्षाच आहे.

मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश रुग्णांसाठी घाटी वरदान ठरली आहे. याठिकाणी दररोज हजारो रुग्णावर उपचार केले जातात. मात्र दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत घाटीमध्ये पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांची अनेक वेळा हेळसांड होताना पाहायला मिळते. यामुळे या रिक्त जागा भराव्या अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र शासनाकडून चालढकल केली जात असल्याने मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. राज्यभरातील रिक्त असलेली निवासी डॉक्टरांची पदे भरण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने पदे भरण्याचे आश्वासन देत याबाबतचा अध्यादेश काढला. औरंगाबादेत एमबीबीएसच्या २०० विद्यार्थ्यांच्या जागा आहेत. त्यानुसार प्रस्थापित मानकांनुसार १११ वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या ३६ पदे मंजूर आहेत. त्यामुळे नव्याने ७५ निवासी डॉक्टर घाटीला मिळणार असल्याने उत्साह होता.  मात्र अद्यापही या रिक्त जागा न भरल्यामुळे राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.