समान पाणीवाटपासाठी आता आयुक्‍तांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Foto

औरंगाबाद: शहरातील अनेक भागात अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असून, सिडको, हडकोसह अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. ऐन पावसाळ्यात शहरात पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी नुकतीच मनपा आयुक्‍त डॉ.निपुण विनायक यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्यासंबंधी योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यावर दीड दिवसात समान पाणीवाटपाचे नियोजन करण्याचे आश्‍वासन आयुक्‍तांनी राज्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी त्यासंबंधी नियोजन केले. आता समान पाणीपुरवठ्यासंबंधीच्या संचिकेवर मनपा आयुक्‍तांची स्वाक्षरी होणे बाकी असून, त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर प्रत्यक्ष समान पाणीवाटप सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.

औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी धरणातील पाणीपातळी मृतसाठ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जायकवाडीतून शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यात घट झाली असून, जे पाणी शहरात येते त्यांचेही योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने कुठे चार ते सहा दिवसांआड तर कुठे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या जायकवाडीत 45 एमएलडी आणि 100 एमएलडी अशा दोन पाणीपुरवठा योजना आहेत. तेथून शहरासाठी फारोळामार्गे पाणी पोहोचवण्यात येते. मात्र, सध्या नाथसागराची पाणीपातळी मृत साठ्यात गेली असल्याने पाणी उपसा क्षमतेपेक्षा कमी होत आहे. 
जेवढे पाणी शहरात येते त्याचेही योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने काही वसाहतींमध्ये चार ते सहा दिवसांआड तर कुठे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेषतः सिडको-हडको भागात पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र पाहायला मिळते. 

पाणीप्रश्‍नासंबंधी सिडको भागातील नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्‍तांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री व औरंगाबाद (पूर्व) चे आमदार अतुल सावे यांनी थेट मनपा मुख्यालय गाठत याप्रश्‍नी मनपा आयुक्‍त डॉ.निपुण विनायक यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीत आयुक्‍तांनी दीड दिवसात समान पाणीवाटपाचे नियोजन करण्याचे आश्‍वासन सावे यांना दिले होते. याची जबाबदारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे आयुक्‍तांनी सोपविली. त्यानुसार पानझडे यांनी समान पाणीवाटपाचे नियोजन केले असून, यात काही भागांचा गॅप वाढविण्यात येऊन समान पाणीवाटप करण्यात येणार असल्याचे समजते. समान पाणीवाटपाची संचिका आता आयुक्‍तांसमोर ठेवण्यात येणार आहे. आयुक्‍तांच्या स्वाक्षरीनंतर शहराला समान पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते. मनपा आयुक्‍त डॉ.विनायक हे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले असल्याने या संचिकेवर अद्याप त्यांची स्वाक्षरी झालेली नाही. सोमवारी आयुक्‍तांसमोर ही संचिका येऊन तिला मान्यता मिळेल व त्यानंतर प्रत्यक्ष समान पाणीवाटप सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker