शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
गंगापूर, (प्रतिनिधी) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. पोलीस ठाणे वाळूजचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या रूट १ व झोन मार्चमध्ये पोलीस ठाणे वाळूज, क्यूआरटी, झोन २ आरसीपी तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
सदर रूट मार्चला वाळूज पोलीस ठाण्यातून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साठे नगर, मोंढा, रामराई टी पॉइंट, - कमलापूर रोड, सराफा मार्केट, झेंडा मैदान, मुकेश बोरा यांच्या घराजवळून वाळूज गावाची वेशी या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा वाळूज पोलीस ठाण्यात रूट मार्चची सांगता करण्यात आली.
गणपती विसर्जनाच्या काळात नागरिकांनी शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त व गस्त वाढविण्यात येत आहे. रूट मार्चच्या माध्यमातून व पोलिसांची सज्जता व सुरक्षा व्यवस्थेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
-- वाळुज पोलिसांची सज्जता --
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रूट मार्च घेण्यात आला. विविध पथकांतील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.












