संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचा दावा किती पोकळ आहे याचा प्रत्यय रस्त्यावर फिरताना येतो. भटकंती करणारे वेगवेगळी कारणे शोधत आहेत तर काही बहाद्दरांनी पोलिसी सिसेमिरा चुकविण्यासाठी खुस्कीचे मार्गही शोधले आहेत.
सकाळी साडेआठच्या सुमारास जळगाव रस्त्यावर एक कार अन चौघे स्वार ! असे बिनधास्त प्रवास करताना आढळून आले. तर एका दुचाकीवर दोघांचा प्रवास सर्वसामान्य बाब झाली आहे.
संचारबंदीच्या पहिल्या दिवसानंतर फिरस्ते पळवाटा शोधू लागतात. खुस्कीचे मार्ग आणि बहानेबाजी करीत पोलिसांना चकमा देण्यात येतो. गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर वाढलेली दुचाकी आणि चारचाकीची गर्दी अशा चाणाक्ष फिरस्त्याचीच आहे. शहरात पोलीस प्रशासनासोबत मनपाच्या पथकांचीही तैनाती करण्यात आली आहे. अशाही परिस्थितीत अनेकांचा मुक्तसंचार सुरू असल्याचे दिसते. डबल सीट दुचाकीस्वार तर प्रत्येक रस्त्यावरून जाताना आढळतात. तर चारचाकी वाहनात दोन अथवा तिघांची परवानगी असताना त्याहून अधिक डोके दिसून येतात. सकाळी साडेआठच्या सुमारास जळगाव रोड वरून एक कार धावत होती. या कारमध्ये चौघेजण बसलेले होते. हर्सूल टी पॉइंट वर कडक तपासणी असल्याने मधल्यामार्गे जळगाव रोडवर आणण्यात आली. जाधव वाडी टी पॉईंटवर पोलिसांना चकमा देऊन ही कार आंबेडकर चौकाकडे निघाली. सकाळच्या वेळी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती कमी असल्याचा फायदा ड्रायव्हरने घेतला. खरे तर जळगाव रोड वनवे करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट टाकून एक मार्ग बंद केला आहे. तरीही या कारला अडवण्यात आले नाही. आंबेडकर चौकातही कार अडवली गेली नाही. त्यानंतर सिडको येथे कडक तपासणी होत असल्याने ड्रायव्हरने व्होखार्ड चौकातून कार कलाग्रामकडे सुसाट वेगाने गेली. आता त्या मार्गाने विनाअडथळा कार चिकलठाण्याकडे जाईल. अशाप्रकारे पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यात कार चालक यशस्वी झाला होता. असे प्रकार सर्रास घडत आहेत. काल दुपारी टीव्ही सेंटरच्या पोलीस पेट्रोल पंपावर एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी आला. उपस्थित सुरक्षारक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. सदर दुचाकी चालकाने औषधी ची पावती दाखवली. तेव्हा कर्तव्यावरील पोलिसाने तू राहतो, त्याच भागात मेडिकल असेल तिथून घे. असे म्हणून पेट्रोल देण्यास नकार दिला. एकंदरीत बहानेबाजी सुरू झाली आहे. रस्त्यावर गर्दी वाढण्याचा धोकाही वाढला आहे. या परिस्थितीत आता पोलीस आणि मनपा प्रशासनाने अधिक कठोर होण्याची गरज असल्याचे बोलले जाते.











