किल्ले अशेरीगडावर पैठण दुर्ग प्रतिष्ठानची भटकंती

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठण दुर्ग प्रतिष्ठान च्या वतीने पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले अशेरीगडावर भटकंती आणि अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

पैठण दुर्ग प्रतिष्ठान या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर भटकंती आणि अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात येते. १ फेब्रुवारी रोजी मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मनोर नाक्याजवळ व खोडकोना या गावच्या हद्दीत असलेल्या २२३० फुट उंच आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या ८०० वर्ष जुन्या शिलाहारकालीन बुलंद डोंगरी किल्ल्यावर भटकंती करण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या
खोडकोना या आदिवासी गावात ३१ जानेवारी रात्रीचा मुक्काम ठोकण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अशेरीगड किल्ला प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करण्यात आली.

जंगलातून, दरीखोऱ्यातून, नदी ओढ्यातून कडे, कपारीतून लोखंडी शिड्या चढून चार तासाची तंगड तोड केल्यानंतर ११ वाजेच्या सुमारास गडाचा शिखर माथा गाठण्यात आला. पैठण दुर्ग प्रतिष्ठानचे समन्वयक शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली, दुर्ग अभ्यासक महेश गोंडे पाटील व इतिहास प्रेमी बजरंग काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गड माथ्यावर असलेल्या विविध ऐतिहासिक वास्तूंचा डोळसपणे अभ्यास करण्यात आला. गडाच्या पठारावर वीस पेक्षा जास्त पाण्याचे टाके, दोन भले मोठे तलाव, भव्य तटबंदी, खणखणीत बुरुज, पडक्या वाड्यांचे अवशेष, नवीनच उभारण्यात आलेल्या तोफासह तोफगाडे, कातळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या असा अनेक अवशेष असलेला हा ऐतिहासिक किल्ला शिलाहर वंशाच्या भोज राजाने बांधला आहे. 

या किल्ल्यावर राजा बिंबदेव, पोर्तुगीज, मराठा आणि इंग्रज आदी राजवटीने राज्य केल्याचे आपणास आढळून येते. या भटकंती मोहिमेमध्ये शिवाजी गाडे, प्रकाश सोनवणे, द्वारकादास निवारे, सुरेश गवळी, सोपान बांगर, सुनील पायघन, महेश गोंडे पाटील, बजरंग काळे, दत्तात्रय पोकळे या दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता.