मोहरम मिरवणुकीतील "किमान १५ हजार लोकांना मारायचे होते..."; आरोपीची धक्कादायक कबुली !!

Foto
मुंबई - शहरात मोहरमच्या मिरवणुकीत हजारो लोकांना मारण्याचा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला आहे. या प्रकरणात पुण्यातील ३९ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपीच्या पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मला किमान १५ हजार लोकांना मारायचे होते अशी खळबळजनक कबुली आरोपीने दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

अटक करण्यात आरोपी फैयाज प्रेमजी हा पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा आहे आणि त्याचा पेटिंगचा व्यवसाय आहे. तो काही दिवसांपासून मुंबईतील डोंगरी भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, फैयाजने मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांना पेन किलर असल्याचं सांगत विषारी औषध असलेली कॅप्सूल वाटण्यास सुरुवात केली होती. या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाइड हे अत्यंत विषारी रसायन आढळून आले. हे रसायन सामान्यतः उंदीर मारण्यासाठी वापरले जाते. ते केमिकल शरीरात गेल्यानंतर गंभीर विषबाधा, अवयव निकामी होणे आणि मृत्यूही होऊ शकतो. आरोपीने प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

मिरवणुकीतील एका व्यक्तीला कॅप्सूल घेतल्यानंतर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तेव्हा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद परिस्थितीत लोकांना कॅप्सूल वाटताना पाहिले. त्याच्या वागणुकीबद्दल संशय आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि कॅप्सूल जप्त केल्या. प्राथमिक तपासात हे प्रकरण गंभीर असल्याचे उघड झाले आणि आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. जर आरोपीला वेळेवर पकडले नसते तर या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती अशी भीती पोलिसांनी वर्तवली. 

दरम्यान, या कटात आणखी कुणी सहभागी होते का याचा पोलीस तपास करत  आहेत. आरोपी हा पेंट विक्रेता आहे. त्याने या व्यवसायातून विषारी रसायने मिळवली, तर रिकाम्या कॅप्सूल ऑनलाइन मागवल्या होत्या. पोलीस आता त्याचे आर्थिक व्यवहार, मोबाईल फोन, डिजिटल हालचाली आणि संपर्कांची चौकशी करत आहेत. याशिवाय त्याच्या परदेश प्रवासाच्या नोंदींची छाननी केली जात आहे. त्याचे कोणत्याही परदेशी संघटना किंवा व्यक्तींशी संबंध होते का? किंवा या कथित कटामागे एक मोठे नेटवर्क सक्रिय होते का? हे तपास यंत्रणा शोधत आहेत. 

आरोपीचा इराण-इराक परदेश प्रवास

पोलिसांना आरोपीच्या चौकशीत आणखी एक गोष्ट कळली आहे. आरोपीने २०१९ ते २०२५ या कालावधीत अनेक वेळा इराण आणि इराकला प्रवास केला होता. गेल्या एका वर्षातच त्याने १९ वेळा या देशांना भेट दिली होती. या दौऱ्यांचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे.