पुणे नागपूर : पुण्यात शुक्रवारी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडत आहे. मात्र, या मतदानावेळी भाजपकडून स्पाय कॅमेर्याचा वापर होत असल्याचा सनसनाटी आरोप शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांनी संबंधित स्पाय कॅमेर्याची माहिती माझ्याकडे पाठवावी. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्पायकॅमच्या मदतीने पुण्यात मतदान केले जात आहे, भाजपला मतदान केल्यावर पैसे मिळत आहेत, असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. तो स्पायकॅम म्हणजे काय, तो कसा असतो, हे सुप्रिया ताईंनी पाठवलं, तर मी तो पेन कसा असतो समजून घेईन, काय चाललंय, हे समजून घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
नागपूरमध्ये मतदानाचा उत्साह दिसत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे. नागपूर पदवीधर, अमरावती आणि पुणे शिक्षक, छत्रपती संभाजीनगर, पुणे पदवीधर या पाचही ठिकाणी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे, हे मतदान चांगले पार पडेल, हा विश्वास आहे. मला आनंद आहे, रांगा दिसत आहे, लोक मतदानाचा हक्क बजावत आहेत, लोकशाहीत हेच अपेक्षित आहे. मला विश्वास आहे, योग्य अशा पद्धतीचा निकाल लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लीपबाबतही भाष्य केले. काल शिवसेना नेत्यांचे शिष्टमंडळ मला भेटायला आले होते. जी ऑडिओ क्लीप समोर आली, संभाषण समोर आले आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी होईल, असे आश्वासन मी शिवसेना नेत्यांना दिले आहे. आम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की, अडीच वर्षानंतर हे संभाषण बाहेर येण्यामागील हेतू काय आहेत? कोणाला टार्गेट केलं जात आहे आणि कशासाठी? मनोज जरांगे यांनीही चौकशीची मागणी केली आहे. भाजप आणि शिवसेनेचीही तीच मागणी आहे. यातील सत्य आम्ही बाहेर काढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांचा नेमका आरोप काय ?
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत.या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणार्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.