पुणे : या वर्षी मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी घरं वाहून गेल्यानं अनेकांचा संसार उघड्यावर आला तसेच पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. दरम्यान आता अनेक राज्यांमध्ये हळुहळु थंडीचा कडाका वाढू लागला आहे, मात्र थंडीचा कडाका वाढत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये आयएमडीकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. डिटवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळसोबतच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुचेरी आणि अंदमान व निकोबार या बेटांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
श्रीलंकेला डिटवाह चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे, या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळे देशात शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत, त्यांचा आता शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे श्रीलंकेत प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकरलं आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये भारतात हवेचा वेग प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, प्रति तास 90 किमी वेगाने वारे वाहन्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील होणार आहे, राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र ठंडीचा कडाका वाढणार आह, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.