औरंगाबाद: जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसानंतर गेले दोन आठवडे जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्वत्र धो-धो पावसाची अपेक्षा व्यक्त होत होती. वरूण राजाने अखेर काल ती पूर्ण केली. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ५७ मिमी तर फुलंब्री तालुक्यात सर्वात कमी १८ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांत मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठवाड्यावर वरूण राजाने कृपादृष्टी केली असली तरी अजूनही सरासरीएवढा पाऊस पडलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, पैठण हे तालुके पावसाच्या प्रतीक्षेत होते. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यात त्यामानाने चांगला पाऊस झाला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली. पैठण, गंगापूर, वैजापूर सह खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात काही प्रमाणात अजूनही पेरणी झालेली नव्हती. कालच्या पावसाने जिल्ह्या भर पेरण्या पूर्ण होनार आहे. या पावसाने खरिपाची पेरणी शंभर टक्के पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. काल दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गंगापुर तालुक्यातील मांजरी, वाळूज यासह इतर मंडळात चांगला पाऊस झाला. औरंगा बाद मंडळातही उस्मानपुरा ३५, भावसिंगपुरा ४१, कांचनवाडी ३५, चिकलठाणा ३३, लाडसावंगी व करमाड २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पैठण तालुक्यातही सर्वदूर पाऊस पडला पैठण मंडळात २१, बिडकीन १८, पिंपळगाव १९ तर पाचोड लोहगाव विहामांडवा नांदेड परिसरात १४ मिमी पाऊस झाला आहे. सोयगाव तालुक्यातही चांगला पाऊस झाला. बनोटी शिवारात १२ मिमी पावसाची नोंद झाली. वैजापूर तालुक्यातही सर्वदूर पाऊस पडला आहे वैजापूर मंडळात २२ लाडगाव, नागमठाण परिसरात १८ तर खंडाळा, महालगाव, शिरूर परिसरात १२ मिमी पाऊस पडला आहे. फुलंब्री तालुक्यात कमी पाऊस झाला. आळंद, वडोद बाजार, पिरबावडा परिसरात ६ ते ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कन्नड- खुलताबाद या दोन तालुक्यात मात्र कालचा पाऊस झालेला नाही. कन्नड तालुक्यात अवघा दोन तर खुलताबाद तालुक्यात तीन मिमी पाऊस पडला आहे.