दंडासोबत फौजदारी दाखल करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) टाक्या ओव्हरफ्लो होऊनही नळ सुरू ठेवणे आणि रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना आता महापालिकेचा
दणका बसणार आहे. वारंवार कारवाई करूनही पाण्याची नासाडी थांबत नसल्याने ही परिस्थिती न सुधारल्यास संबंधित भागात आठवड्यातून अवघ्या एकदाच पाणीपुरवठा करण्याचा थेट इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि. १६) दिला. तसेच पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि थेट फौजदारी गुन्हे दाखल कडक इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेला जुन्या १२०० मिमी व्यासाच्या योजनेतून ८० ते ९० एमएलडी, नवीन २५०० मिमी व्यासाच्या योजनेतून सुमारे १०० एमएलडी आणि २०० मिमी व्यासाच्या योजनेतून २५ एमएलडी पाणी मिळते.
शहराला दररोज एकूण २०५ ते २१५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उपलब्धतेनुसार काही भागांत तीन दिवसांनी, तर अन्य भागांत चार ते पाच दिवसांनी पाणी दिले जाते.
सिमेंट रस्त्यामुळे पाणी मुरत नाही
सिमेंट रस्त्यांमुळे नळातून वाहणारे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी रस्त्यावरून वाहून जाते. नळांना तोट्या नसल्याने होणारी नासाडीही उघडपणे दिसते. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मनपा आयुक्त येडगेंचा इशारा
पुढील आठ ते नऊ महिने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून वापरावे लागणार आहे. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई करूनही ज्या भागांत पाण्याची नासाडी थांबणार नाही, तेथील पाणीपुरवठ्यातील अंतर वाढविण्यात येईल, असा इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













