औरंगाबाद: दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होणाऱ्या खर्चात सध्या 'पाणी खर्च' सध्या टॉपवर आहे. पेट्रोल महागलयाची ओरड करीत सर्वाधिक खर्च पेट्रोल वरच करणाऱ्या कुटुंबांना आता पाण्याचा भडका उडल्याचा अनुभव येऊ लागलाय. महिन्याकाठी लागणाऱ्या रेशन एवढा खर्च पाण्यावर होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणितच बिघडले आहे.
पिण्याच्या पाण्याचा एक जार तीस रुपयांना मिळतो तर दोन हजार लिटरचे टॅंकर ७०० ते ८०० रुपयांना मिळते. चार जणांच्या कुटुंबाला दिवसाकाठी किमान २५० लिटर पाणी लागते. या कुटुंबाला तब्बल १०० रुपये प्रति दिन पाण्यासाठी खर्चावे लागत आहेत. महिना काठी लागणाऱ्या रेशन इतकाच खर्च आता पाण्यावर होऊ लागलाय. बरे पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने आता जगायचे कसे ? असा प्रश्न शहरवासीयांना पुढे आहे. एकीकडे दुष्काळाने हातातले रोजगार हिरावला अन काम मिळणे मुश्किल झाले. तर दुसरीकडे पाणीही विकत घेण्याची वेळ वेळ सर्वसामान्यांवर आली. या दुहेरी माराने शहरातील हजारो कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. चार जणांच्या कुटुंबाला सर्वाधिक खर्च पाण्यावर करावा लागत आहे.
पाणी नॉमिक्स ( ४ सदस्यांच्या कुटुंबासाठी)
पाण्यावरील दैनंदीन खर्च :
पिण्याचे पाणी १ जार : ३० रुपये
वापरायचे पाणी २०० लिटर : ७० रुपये किमान
प्रतिदिन पाण्यावरील खर्च : १०० रुपये किमान
महिन्याचा खर्च : ३००० रुपये
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची महिन्याभराची कमाई १० ते १५ हजार असते. स्वतःचे घर नसेल तर किमान अडीच ते तीन हजार रुपये घर भाडे द्यावे लागते. पेट्रोल वरील खर्च किमान हजार ते दीड हजार रुपये महिन्याकाठी होतो. तीन हजार रुपये किराणा रेशनवर खर्च होतो. अशा परिस्थितीत या कुटुंबाला महिन्याकाठी तब्बल तीन हजार रुपये पाण्यासाठी खर्च करावा लागत असल्याने मध्यम वर्गीयांना शहरात जगणेच अवघड झाले आहे.
शहरातील चार लाख लोकसंख्या प्रभावित :
पाणीटंचाईने शहरातील चार लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. या नागरिकांना पैसे मोजूनही वेळेवर पाणी मिळत नाही. गुंठेवारी तसेच नव्या वसाहती महानगरपालिकेचे टॅंकर आठ दिवस येत नाही खाजगी टॅंकरही दोन दोन दिवस मिळत नाही.
आमच्याकडे लईच पाणीटंचाई
फळांचा राजा आंब्याचा हंगाम सुरू झालाय अक्षय तृतीया नंतर रसाळीच्या पंगती उठत असतात. त्याचबरोबर बच्चे कंपनी मामाच्या गावाला जातात. यावर्षी मात्र आमच्याकडे तीव्र पाणीटंचाई असल्याचा निरोप पाहुणे पाठवत आहेत. शहरासह ग्रामीण भागात हीच परिस्थिती असल्याने पाहुणे येऊच नयेत अशीही भावना दिसून येते. त्यामुळे यंदा रसाळ ब्रेक लागेल अन बच्चेकंपनी चाही हिरमोड होणार आहे.