पाणीपट्टीत होणार कपात; महापौरांचे संकेत !

Foto

औरंगाबाद: आगामी काळात होऊ घातलेल्या  विधानसभा निवडणूका लक्षात घेत पाणी पट्टीत  कपात करण्याचा निर्णय विचाराधीन असून,पुढील सर्वसाधारण सभेत तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे संकेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी युतीच्या पदाधिकार्‍यांची पाणीप्रश्‍नावर चांगलीच कोेंडी झाली होती. सध्या शहरात सरासरी 7 दिवसाआड पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. यानुसार वर्षभरात केवळ 40 ते 50 दिवस नागरिकांना पाणी मिळते. असे असताना दुसरीकडे मात्र, पालिकेकडून पाणीपट्टी पूर्णवर्षभराची वसूल केली जाते. 2012 साली नव्याने समांतर योजना आली तेव्हा पासून वर्षाला 10 टक्के दरवाढ करण्याची तरतूद करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर आता समांतर बारगळली त्यामुळे दरवाढ करणे योग्य नसल्याने आचारसंहितेनंतर लागलीच सर्वसाधारण सभेत प्रस्तावित दरवाढ रद्द करणार असल्याचे घोडेले यांनी सोमवारी सांगितले.  याचबरोबर पाणीपट्टी सध्या 4050 रुपये आकारली जाते. यातही कपात करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही याला सहमती दर्शविली असल्याचे ते म्हणाले.याबातच प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याच मुद्यावरून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच या निर्णय विचाराधीन असल्याचे बोलले जाते. मात्र, सध्याच्या रकमेत किती कपात होणार याचा निर्णय सर्वसाधारण सभेतच होणार असल्याचे समजते.