नव्या योजनेचे पाणी पोहोचले ४ टाक्यांमध्ये

Foto
शहरातील पाणीपुरवठ्याला मिळणार गती; नागरिकांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून १५०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाइपलाइनद्वारे जलकुंभांमध्ये पाणी घेण्यास बुधवारपासून (दि.१९) प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यानंतर गुरुवारी (दि.२०) आणखी दोन जलकुंभांमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. नवीन योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारत असून नागरिकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
शहराच्या नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत २२ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजप नेते व
अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिडको एन-५ येथील दोन जलकुंभांत पाणी घेण्यात आले होते.
मात्र, १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील जॉइंट अवघ्या काही तासांतच निखळले. त्यानंतर दुरुस्तीसाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागला. दरम्यान, जलवाहिनीची नव्याने स्वच्छता करत दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सिडको एन-५च्या जलकुंभात पाणी घेण्यात आले, पण त्यात क्लोरोनची मात्रा योग्य प्रमाणात नसल्याचे स्पष्ट झाल्याने पाणी सोडून देण्यात आले. अखेर बुधवारी ४ टाक्यांमध्ये पाणी घेण्यात आल्याचे अमोल वेडगे यांनी पत्रकारांना सांगितले.
पाणीपुरवठ्यातील गॅप कमी
नवीन पाणी योजने टप्प्या-टप्प्याने पाणी वाढत असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यातील गॅप आता कमी झाला आहे. मरिमाता परिसराला १३-१४ दिवसाआड पाणी मिळत होते, ते आता ७ दिवसाआड आले आहे, चिकलठाणा भागाला सातव्या आठव्या दिवशी पाणी दिले जात आहे. शहरातही ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर हा गॅप आणखी एक दिवसाने कमी होईल, म्हणजेच चार दिवसाआड पाणी मिळेल, असेही येडगे यांनी सांगितले.
१५-२० एमएलडी वाढीव पाणी
सिडको एन-५ येथील दोन तर टी. व्ही. सेंटर, हरसिद्धी माता मंदिर परिसरातील एका टाकीमध्ये पाणी घेण्यात आले आहे. सिडको एन-७ येथील दोन टाक्यांमध्ये गुरुवारी पाणी घेण्याचे नियोजन आहे. या जलवाहिनीमुळे १५-२० एमएलडी वाढीव पाणी मिळणार आहे.
https://epaper.sanjwarta.in Powered By: Vrudhee Solut