औरंगाबाद: जिल्ह्यातील मुख्य प्रशासकीय कार्यालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः पाणी बाणी सुरू आहे. अपुऱ्या आणि बंद वॉटर कुलरमुळे अभ्यागतांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. दररोज शेकडोंच्या संख्येने येणारे नागरिक पाण्यासाठी वण वण भटकत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांचे प्रमुख कार्यालय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शेकडोंच्या संख्येने कर्मचारी आणि दररोज तेवढ्याच प्रमाणात येणारे नागरिक यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सतत वर्दळ असते. कार्यालयाच्या परिसरात असंख्य छोटी-मोठी कार्यालय आहेत. तहसील तसेच अप्पर तहसील कार्यालय येथेच आहे. तालुका अन्नधान्य विभाग, रजिस्ट्री ऑफिस, नगर रचना, भूवैज्ञानिक, गौण खनिज, सेतू सुविधा केंद्रही याच परिसरात असल्याने दररोज मोठ्या संख्येने अभ्यागत येत असतात. सुसज्ज आणि भव्य कार्यालय असले तरी येथे पिण्याच्या पाण्याची सोय मात्र केलेली नाही. तळमजल्यावर निवडणूक विभागात एक वॉटर कुलर आहे अतिशय अडचणीच्या ठिकाणी असलेले हे वॉटर कलर सहजासहजी सर्वसामान्यांना सापडत नाही. पहिल्या मजल्यावर पुरवठा विभागाच्या बाजूला आणि रोहयो विभागाजवळ असे दोन वॉटर कुलर आहेत मात्र येथे पाणी पिण्यासाठी ना ग्लास असतो ना बाटली. अतिशय कमी क्षमतेचे हे वॉटर कुलर कधी बंद तर कधी सुरू असते. हे वॉटर कुलरही सर्वसामान्यांना सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवलेले आहे. सर्वसामान्यांना दिसेल अशा दर्शनी जागी आणि मोठ्या क्षमतेची वॉटर कुलर लावावे अशी मागणी गेल्या वर्षभरापासून होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दोन वॉटर कुलर दुरुस्त करून दिले होते. त्यानंतर पुन्हा या वॉटर कुलर कडे लक्ष दिले नसल्याने ते बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.
व्हीआयपी वॉटर कुलरही बंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन शेजारीच एक व्हीआयपी वॉटर कुलर बसविलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या अधिकारी तसेच प्रतिष्ठीतांना पाणी देण्यासाठी या कुलरचा वापर होतो. त्याच बरोबर महत्वाच्या बैठकीतही याच कूलर मधून पाणी दिल्या जाते सर्वसामान्यांना या कुलरकडे प्रवेश बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कुलर बंद पडले आहे त्यामुळे खुद्द अधिकाऱ्यांना पाणी देण्यासाठी शिपायांना वणवण भटकावे लागते.
पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र इथे आल्यानंतर त्यांना साधे पाणीही मिळत नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये पैसे खर्च करून पाणी प्यावे लागते. भव्यदिव्य जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्यासाठी पाणीही मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. त्यामानाने जिल्हा परिषद, महानगरपालिका यासह शहरातील इतर कार्यालयात दर्शनी भागातच मोठमोठे कुलर लावलेले आहेत. येथे चोवीस तास पाणी उपलब्ध असते. उष्णतेचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिकच वाढते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासनाने किमान पाणी तरी उपलब्ध करावे अशी मागणी होत आहे
पाण्याची नासाडी
अपुरे वॉटर कुलर आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय यामुळे कार्यालयात येणारे अभ्यागत त्रस्त होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयावरील पाण्याच्या टाक्या रोजच ओहर फ्लो होत असतात. टाक्यांतून धो धो पाणी वाहत असते. दररोज हजारो लिटर पाणी असे वाया जाते मात्र हेच वाया जाणारे पाणी मोठ्या वॉटर कुलरद्वारे जनतेला मिळाले तर बिघडणार कुठे ? असेही बोलले जाते