पैठण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा : विभागीय आयुक्ताकडे मागणी

Foto
 पैठण, (प्रतिनिधी) नवीन जल कुंभनिर्माण पाठपुरावा कृती समितीच्या वतीने नगरपरिषद पैठण कार्यालयासमोरील टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरीही पूर्णतः उभा राहिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून शहरातील रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत नसल्यामुळे, कार्यकर्त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी तहसील कार्यालय पैठण समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

याची नगर परिषदेने दखल घेऊन ३० जुलै २०२५ पासून शहरातील नागरिकांना
रंगार हट्टी परिसरातील नव्या टाकीमधून पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी पत्र कृती समितीस दिले होते. 

पत्र देऊन दोन महिने उलटल्यानंतरही, नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नव्या टाकीतून नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्यामुळे, कृती समितीचे प्रसाद खिस्ती, मुरलीधर साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय महसूल आयुक्त जितेंद्र पापळकर यांची ७ ऑक्टोबर मंगळवारी रोजी संभाजीनगर येथे भेट घेऊन, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चीड आणणाऱ्या कारभाराचा पाडा वाचला.

कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियमित, सुरळीत करण्यात यावा, असे आशयाचे एक निवेदन त्यांना सादर करून त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नगरपरिषदेच्या निकामी झालेल्या पंपहाऊसची तसेच तहसील कार्यालयातील पडवयास झालेल्या पाण्याच्या टाकीचीही पाहणी करण्यासाठी एक पथक पाठवावे, असाही आग्रह शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे धरला आहे.