अन्यथा शहराचा पाणी पुरवठा होऊ देणार नाही
हर्सूल, एकतानगर, सारा वैभव वासियांचा इशारा
हर्सूल तलावातून जुन्या शहरातील 14 वॉर्डांना पाणी पुरवठा केला जातो. पण हर्सूल तलावाशेजारी असलेल्या 10 ते 15 वसाहतींना तलावातून पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे या वसाहतीतील हजारो नागरिकांना बोअरवेल आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जोपर्यंत या वसाहतींना तलावातून पाणीपुरवठा केला जात नाही, तोपर्यंत तलावातून शहराला पाणीपुरवठा करू देणार नाही, असा इशारा परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
धरण उशाला कोरड घशाला
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हण आहे. तशीच अवस्था आज हर्सूल तलावानजिक असलेल्या हर्सूल गाव, एकतानगर, राधास्वामी कॉलनी, सारा वैभव, जटवाडा रोडवरील अनेक वसाहती झाल्या आहेत. जलवाहिनी टाकली नसल्याने बोअरवेल व टँकरद्वारे पाणी मिळते. या नागरिकांना धरण हाकेच्या अंतरावर असतानाही पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील महिला, पुरुषांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागते. 14 वर्षानंतर पहिल्यांदा हर्सूल तलाव पूर्णपणे भरला आहे. सोमवारी शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी जलपूजन केले. यावेळीही नागरिकांनी त्यांची मागणी या नेत्यांपुढे ठेवली. आज सकाळी हर्सूलच्या ग्रामस्थांनी जलपूजन केले. योवेळी परिसरातील नागरिवकांनी जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करा नसता शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, दादासाहेब औताडे, कल्याण बुर्हांडे, बाळासाहेब औताडे, गणेश हरणे, किशोर उगले आदी उपस्थित होते.