सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवत आहेत, सोमवारपर्यंत तालुक्यातील १२ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. इतर १२ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी तालुक्यात काही गावांना नेहमीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. यावर्षी तालुक्यातील वांगी, चिंचवन, वरुड (खुर्द), पिंपरी, बोदवड, सराटी, बोजगाव, मोढा (खुर्द) वाडी वस्ती, वडोदचाथा, तलवाडा, आसडी व वडोदचाथा वस्ती या १२ गावांना १६ टँकरद्वारे ३१ खेपा सुरू आहेत. याशिवाय बोरगाव बाजार, मूकपाठ, दीडगाव, केह-हऱ्हाळा, आसडी, म्हसला (बुद्रुक) धारला, गेवराई सेमी, अंधारी, बोरगाव कासारी व बनकिन्होळा या बारा गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सध्या पंचायत समिती विभागाच्या पाणीपुरवठा विभागाकडे धावडा, लिहा व रेलगाव येथील परदेशी वाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकरसाठी प्रस्ताव आलेले आहेत.













