छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): जिल्ह्यात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले असून, अडीच लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्याची मदार आता टँकरवर आली आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा, उपलब्ध स्रोतांवरील वाढता ताण आणि पाणीपुरवठ्याच्या खेपांचे नियोजन अशा तिहेरी आव्हानांना प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या २५ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, तब्बल २ लाख ५२ हजार ३२० नागरिकांसाठी १७० खासगी टैंकर धावत असून, ११३ गावे आणि २९ वाड्या टंचाईच्या विळख्यात सापडल्या आहेत. पाणीटंचाईची तीव्रता पाहता आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रशासनासाठी कसोटी ठरणार आहे. जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता पैठण आणि गंगापूर तालुक्यांत सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्ह्यातील एकूण १७० टँकरपैकी १११ टँकर केवळ पैठण आणि गंगापूर तालुक्यांत कार्यरत आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ६५ टक्के टँकर या दोन तालुक्यांतील पाणीटंचाई निवारण्यासाठी वापरले जात आहेत. यावरून या भागांतील पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित होते. पैठण तालुक्यात ३३ गावे आणि १५ वाड्यांसाठी ५३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
या तालुक्यासाठी दररोज ९३ खेपा मंजूर आहेत. दुसरीकडे, गंगापूर तालुक्यातील ३७ गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ५८ टँकर धावत असून, मंजूर असलेल्या सर्व ११६ खेपा पूर्ण होत आहेत. टँकरवरील वाढता भार कमी करण्यासाठी प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
जिल्ह्यातील ६५ गावांसाठी एकूण ६९ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापैकी ५६ विहिरी टँकर भरण्यासाठी, तर १३ विहिरी वैयक्तिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, विहिरींचे अधिग्रहण केल्यानेच प्रश्न सुटणार नसून, त्यातील पाण्याची उपलब्धता, टँकर भरण्याची क्षमता आणि गावांपर्यंत वेळेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १४ गावे आणि ११ वाड्यांसाठी २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
फुलंब्री तालुक्यातील ११ गावांना १२ टँकरचा आधार आहे, तर वैजापूर तालुक्यातील १८ गावे आणि तीन वाड्यांसाठी २६ टँकर सुरू आहेत. त्यामुळे टंचाईचे संकट केवळ दूरवरच्या ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नसून, जिल्ह्याच्या विविध भागांत पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे.
-- मंजूर खेपा पूर्ण होतात का? --
जिल्ह्यात दररोज ३२४ टैंकर खेपा मंजूर असताना प्रत्यक्षात ३२० खेपाच पूर्ण होत आहेत. म्हणजेच दररोज चार खेपांची तूट राहत आहे. ही तफावत एकूण मंजूर खेपांच्या तुलनेत कमी असली, तरी टंचाईग्रस्त भागांत प्रत्येक खेप महत्त्वाची ठरते. एखाद्या गावात टँकर उशिरा पोहोचणे किंवा नियोजित खेप न होणे याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन पाणीवापरावर होऊ शकतो. त्यामुळे मंजूर खेपा कागदावरच न राहता प्रत्यक्षात पूर्ण होतात का, टँकरच्या फेऱ्यांवर नियमित देखरेख ठेवली जाते का आणि सर्वाधिक टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य मिळते का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. टँकरची संख्या वाढविण्याबरोबरच प्रत्येक खेप वेळेत पूर्ण होणे आणि उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, हेच सध्याच्या टंचाई व्यवस्थापनातील खरे आव्हान आहे.
-- आकडेवारी --
अडीच लाखांची तहान १७० टँकरवर
रोजच्या ३२४ मंजूर खेपांपैकी चार खेपांची तूट
शहरालगतच्या गावांनाही टँकरचा आधार
▶ टँकरवर अवलंबून नागरिक २. ५२ लाख
▶ सुरू असलेले टँकर : १७०
▶ टंचाईग्रस्त गावे : ११३
▶ टंचाईग्रस्त वाड्या : २९
▶ पैठण आणि गंगापूर : १११ टँकर
▶ जिल्ह्यातील एकूण टँकरपैकी सुमारे ६५ टक्के















