भगवानगड : "गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं. तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती करतो", असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबद्दल म्हणाल्या.
आज भगवान गडावर झालेल्या समाज बांधवांच्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की , "चांगल्या माणसाचं चांगलंच होतं. तुम्ही दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने रहा. कुणाचे तुकडे उचलू नका. खोटे धंदे करू नका. गुंड पाळू नका", असे म्हणत पंकजा मुंडे यांनी समर्थकांना स्पष्ट मेसेज दिला. पंकजा मुंडेंनी भगवान बाबांनी दिलेल्या संदेशाची आठवण करून देत समर्थकांना संबोधित केले.
"जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस उभे राहत आहेत. मी एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की, रक्तबिजाला जसं तू संपवलंस, ती शक्ती आम्हाला दे. जातीपातीच्या भिंती नेस्तनाबूत करण्याची शक्ती आम्हाला दे. जेव्हा नदीला पूर आला. लोकांच्या घरात पाणी गेलं. एका बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं, तर बंजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी धान्य घेऊन गेला", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दोन घास कमी, पण स्वाभिमानाने रहा
भगवान बाबांनी दिलेला विचाराचा उल्लेख करत पंकजा मुंडे उपस्थितांना म्हणाल्या, "भगवान बाबा काय म्हणायचे... भगवान बाबा म्हणायचे एक एकर रान विका, पण शिका. तुम्ही शिकलेले वाटत नाहीत मला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या, गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या, भगवान बाबांबद्दल श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करते की, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा."
"नका कुणाचे तुकडे उचलू. नका कुणाचे पैसे घेऊ. नका खोटे काम करू. नका खोटे धंदे करू. नका गुंड पाळू. हे करायची काही गरज नाही. चांगल्या माणसाचं चांगलंच होतं. भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात. मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासमोर मी नतमस्तक झाले, मला अभिमान आहे", असे पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना सुनावले.