मुंबई : मुख्य कबुतरखाना दादरचा आहे. आम्हाला नवीन कबुतरखाना नकोय. हे लोक आम्हाला लॉलीपॉप देत आहेत. जैन नेता हे काम करू शकत नाही, असं मत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी व्यक्त केलं. तसेच दादरचा कबुतरखाना उघडा, मरते दम तक वो हम खोलके रहेंगे, असं विधानही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलं. माझं आंदोलन उपोषण आहे, मला आझाद मैदानाची परवानगी मिळाली आहे. मी जीव दयासाठी उपोषणावर ठाम राहणार असून उद्या (3 नोव्हेंबर) मी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती देखील जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली.
सरकारवर विश्वास आहे, मात्र मागील काही दिवसातील घटना पाहाता चिंतन करावा लागेल. न्यायालयाचा आदेश असला तरी सरकारला मार्ग काढण्यासाठी सांगितलं आहे. मात्र तरीही तोडगा काढला जात नाही. जीवदया फक्त जैन समाजासोबत जोडत आहे. मात्र तसं नाहीय. प्रत्येक व्यक्ती दाणे टाकतो, असं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले.
दादरच्या कबुतरखान्याची ताडपत्री आम्ही काढूनच राहणार
पुण्यातील बोर्डींग, विलेपार्लेतील मंदीर प्रकरण बघून कबुतरांच्या विषयावर चिंतन करण्याची गरज आहे.उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेत. नवीन कबुतरखाने तुम्ही का देता, आम्हाला आमचे जुने कबुतरखाने पाहिजे. फक्त जैन नाही, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचा हा विषय आहे. दादरच्या कबुतरखान्याची ताडपत्री आम्ही काढूनच राहणार आहोत, असं जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले.
चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास ( ) परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारुन या कबुतरखान्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत सध्या बंद करण्यात आलेले कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही, ते बंदच राहणार असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
1. वरळी जलाशय
2. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर
3. ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर
4. बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान