मुंबई : शिंदेसेनेचा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मेळावा होत असून, याची लगबग सुरू असतानाच पक्षाचे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाई यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल मोठे विधान केले. दसऱ्याच्या दिवशीच सरनाईक म्हणाले की, शिवसैनिकांची इच्छा आहे आणि आम्ही एकनाथ शिंदे यांना परत एकदा एका राज्याचे मुख्यमंत्री करू.
प्रताप सरनाईक मुख्यमंत्री पदाबद्दल काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले, "प्रताप सरनाईक काय, आनंद परांजपे काय किंवा आमचे सर्वसामान्य शिवसैनिक; प्रत्येकाला असे वाटते की, एकनाथ शिंदे परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. पण, मुख्यमंत्री होत असताना संख्याबळ हे फार महत्त्वाचे असते."
"आज आमच्याकडे संख्याबळ नाहीये म्हणून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. पण, भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचे संख्याबळ वाढवून आम्ही निश्चितपणे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी जनतेची जी इच्छा आहे, ती पूर्ण करू", असे विधान प्रताप सरनाईक यांनी केले.
शिंदे आताही मुख्यमंत्री होऊ शकतात -अहिर
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या विधानानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनीही मुख्यमंत्री पदाबद्दल भाष्य केले. अहिर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना संख्याबळाची वाट पाहायची आवश्यकता नाही, ते आताही मुख्यमंत्री होऊ शकतात."
एकनाथ शिंदेंकडून दुष्काळग्रस्तांसाठी दिवाळी शिधा रवाना
दरम्यान, दसरा मेळाव्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी मदत साहित्य पाठवले. ठाण्यातील शुभदीप बंगला परिसरातून शिंदे यांच्या हस्ते मदत साहित्य असलेले कंटेनर रवाना करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की, 'सरकार पाठिशी आहे, दुष्काळग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.'