भारत-पाक सामन्यावर हवामानाचे संकट

Foto
कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मधील बहुप्रतिक्षित सामना हा भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीला आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबोमध्ये होईल. गेल्या काही काळातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांनंतर आणि टी-२० वर्ल्डकपपूर्वीच्या वादामुळे या सामन्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. पण श्रीलंकेतून या सामन्यादरम्यान हवामानाच्या आलेल्या अहवालाने सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. टी-ट्व्ोंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजसाठी कोणताही रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीत तारांबळ उडाली आहे. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी असून पाकिस्तान दुसर्‍या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण असले तरी भारताचा रन रेट पाकिस्तानपेक्षा बराच चांगला आहे, ज्यामुळे भारताचे पारडं जड मानलं जात आहे. जर भारताविरूद्धचा सामना पावसामुळे किंवा काही कारणास्तव झाला नाही आणि ड्रॉ झाला तर पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी काहीही करून नेदरलँडला अखेरच्या सामन्यात हरवावच लागेल.

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने भारताविरूद्ध सामना खेळणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पाकिस्तान सरकारने संघाने भारताविरूद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरू नये, असे निर्देश दिले होते. पण आयसीसीच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान सरकारने संघाला भारताविरूद्ध सामना खेळण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत-पाकिस्तान संघाचे सामने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. मोठ्या चर्चांनंतर होणारा हा भारत-पाकिस्तान सामना आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी, श्रीलंकेच्या हवामान विभागाने जाहीर केलं की, रविवार, १५ फेब्रुवारी रोजी आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते, त्यामुळे यादरम्यान सर्व लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या सामन्यादरम्यान पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेतील हवामान अंदाज काय सांगतो?

अ‍ॅक्युवेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. दिवसभरात ९३ टक्के पावसाची शक्यता असून २६ टक्के वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण सुमारे १२.१ मिमी पावसाची नोंद होऊ शकते.

मात्र संध्याकाळी पावसाची शक्यता १३ टक्क्यांपर्यंत कमी होते. भारत-पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. तरीही दिवसभर पडणार्‍या पावसामुळे मैदान आणि खेळपट्टी ओलसर राहू शकते, ज्याचा परिणाम सामन्यावर होऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये अ गटात आहेत. टी-२० विश्वचषकातील गट टप्प्यातील व सुपर-८ सामन्यांसाठी कोणताही रिजर्व डे नसणार आहे. स्पर्धेतील रिजर्व डे हा फक्त दोन्ही सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठी ठेवण्यात आला आहे.