सिल्लोड, (प्रतिनिधी): इंद्रराज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड आणि विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भारतीय ज्ञान परंपरा आणि वाचन संस्कृती या महत्त्वपूर्ण विषयावरील वेबिनार उत्साहात आणि ज्ञानपूर्ण वातावरणात पार पडला.
या वेबिनारमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, ग्रंथपाल तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वेबिनारचे उद्घाटक संस्थेचे सचिव माननीय अशोक देवरे यांनी वेबिनारचे उद्घाटन केले. त्यांनी आपल्या वक्तव्यामधून भारतीय ज्ञान परंपरेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना वेद, उपनिषदे, पुराणे आणि प्राचीन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचे संवर्धन कसे झाले यावर प्रकाश टाकला.
तसेच आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती जपणे आणि वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. वाचाल तर वाचाल असे ते म्हणाले. बेबीनरच्या तांत्रिक सत्रामध्ये विवेकानंद महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. अरुण वाहूळ यांनी वाचन संस्कृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारतीय समाजात वाचन संस्कृतीला विशेष महत्त्व आहे.
आणि या संस्कृतीच्या जपणुकीत व प्रसारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोठे आहे. त्यांचे जीवन हे वाचन, अध्ययन आणि ज्ञानप्राप्तीच्या शक्तीचे जिवंत उदाहरण आहे. डॉ. आंबेडकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आणि वाचनाची प्रचंड आवड होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि जगातील नामांकित विद्यापीठांतून उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात हजारो पुस्तके होती,
ज्यामुळे त्यांना ग्रंथप्रेमी म्हणूनही ओळखले जाते. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यालय दिल्ली विद्यापीठ दिल्ली येथील डॉक्टर अनिल कांबळे यांनी भारतीय ज्ञान परंपरा आणि वाचन संस्कृती या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये इंद्रराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुदत्त राजपूत यांनी सर्वांनी दररोज थोडा वेळ वाचनासाठी राखून ठेवला,
तर निश्चितच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. वाचन हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे मत मांडले. या वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी अत्यंत प्रभावी आणि समर्पक पद्धतीने पार पाडले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. सविता म्हस्के यांनी केले. विशेष उपस्थितीमध्ये विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादाराव शिंदे आणि इंद्रराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. जालिंदर अंभोरे हे उपस्थिती होते.












