नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या एका विधानामुळे विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा आमने-सामने आले. केंद्रीय गृहमंत्र्यांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर भाजपासह सत्ताधारी बाकांवरील खासदार आक्रमक झाले. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
परीक्षा सुधारणा दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू झाली. बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर बोलत असताना विद्यार्थ्यांवरील गोळीबाराबद्दल एक विधान केले.
लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "गृहमंत्री इथे का नाहीयेत? कारण ते घाबरत आहेत." लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, "आज गृह मंत्रालयावर चर्चा होत नाहीये, ज्या विधेयकावर चर्चा होत आहे, ते मंत्री बसलेले आहेत." राहुल गांधी पुढे म्हणाले, "गृह मंत्र्यांनी गोळीबाराची परवानगी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले." राहुल गांधी यांच्या विधानानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्य आक्रमक झाले.
राहुल गांधींनी माफी मागावी; सत्ताधारी प्रचंड आक्रमक
विरोधी पक्षनेते गांधी यांनी केलेल्या विधानावर संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. किरेन रिजिजू म्हणाले की, "तुम्ही विचार करा की, तुम्ही किती चुकीचे बोलत आहात. कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही विचार न करता शब्द वापरत आहात."
"गोळीबाराचे आदेश कोणी दिले, असे कसे म्हणून शकता आपण? हे चुकीचे आहे. राहुल गांधीजी, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही गांभीर्याने बोलले पाहिजे. हे बरोबर नाही. हे विधान तुम्ही कुठल्या आधारावर केले आहे? तुम्हाला कोणी सांगितले? हे कामकाजातून काढून टाकावे आणि राहुल गांधींनी माफी मागावी", अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार विधेयकावर बोलण्याची विनंती केली. मात्र सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.