तुम्ही इतक्या वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे बंधूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Foto
मुंबई : "मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत", असे विधान करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसतच उत्तर दिले. "यापेक्षा सगळ्यात जास्त नैराश्य दुसरं काय असू शकते", अशा शब्दात खिल्ली उडवत फडणवीसांनी राज ठाकरेंना उलट सवाल केला आहे. 

एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. 'आज राज ठाकरे म्हणाले की, नागपूरचे मुंख्यमंत्री आहेत. त्यांना मुंबई काही कळत नाही. मुंबई कळायला मुंबईमध्ये जन्माला यावे लागते?', असे फडणवीसांना विचारण्यात आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसले. 

देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्माला यायचं?

उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, यापेक्षा जास्त नैराश्य दुसरे काय असू शकते. उद्याच्या काळात देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्माला यायचे? देश कळण्याकरिता?", असा सवाल फडणवीस यांनी राज ठाकरे यांना केला. "गुजरातमध्ये जन्मलेले मोदीजी, यांना जेवढा देश माहिती आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरापासून अंदमानपर्यंत... तेवढा कुणाला माहिती आहे?", असेही फडणवीस म्हणाले. 

तुम्ही इतक्या वर्षात मराठी माणसासाठी काय केले?

"मूळात माझं एवढंच म्हणणं आहे की, समजा एका मिनिटासाठी असं समजू की मला कळत नाही. तुम्हाला कळते. मग काय केलं तुम्ही इतक्या वर्षांमध्ये? मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? मुंबईच्या मराठी माणसाला मुंबई सोडून दूर घर घ्यावं लागलं, आपण काय केलं?", असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

"मुंबईमध्ये २५ वर्ष महापालिका चालवली, कोणत्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. मुंबईला पहिल्यांदा नागपूरमधून आलेल्या नितीन गडकरींनी ५५ उड्डाणपूल बांधले. वरळी वांद्रे सी लिंक बांधला. त्यातून मुंबईच्या विकासाची सुरूवात झाली. त्यानंतर माझ्या काळात आणि शिंदेजींच्या काळात झाली", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना दिले. 

'मुंबईत जन्मलो नाही हा आमचा दोष नाही'

"आम्ही मुंबईमध्ये जन्मलो नाही, हा काही आमचा दोष नाहीये. पण, मुंबईत जन्मलेल्यांनी आधी हा हिशेब द्यावा की, तुमच्या सत्तेत तुम्ही काय केले? त्यामुळे नैराश्याशिवाय काहीही नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.