पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्राथमिक चौकशी अहवाल लवकरच सरकारकडे येईल, अशी माहिती विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली. या अपघाताची चौकशी करणारे विमान अपघात तपास आयोग (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांचा तपास प्रगतिपथावर आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे. एएआयबी आणि डीजीसीएची पथके त्यावर काम करीत आहेत. शक्य तितक्या लवकच त्यातील डेटा डाउनलोड केला जाईल. त्या आधारे माहितीचे पृथक्करण केले जाईल आणि चौकशी केली जाईल. चौकशीअंती प्राथमिक अहवाल प्रकाशित केला जाईल, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांचे कुटुब, मित्रपरिवाराला, सहकार्यांना काही शंका आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला वेदना व्हायचे कारण काय?फ असा प्रश्न शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अशा घटना घडतात, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर विविध स्तरांतून शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून तो घातपात असू शकतो, अशा संशयही काही राजकीय नेत्यांनी बोलून दाखवला आहे. मात्र या मृत्यूचे कोणी राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसावून सांगितले आहे. याच मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ङ्गअजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राला वेदना झाल्या, लोक शोकमग्न आहेत. असे काही घडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसत नाही. पण मुख्यमंत्री वारंवार सांगतात की, राजकारण करू नका. पण कोण राजकारण करतेय? असेही राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे संसदेत बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात. तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता, असा संशय येतो. पंतप्रधान ठणठणीत आहेत. तरीही तुम्हाला संशय येतो. मग आमचा एक माणूस मृत्यू पावला आहे, त्यावरून आम्हाला संशय येत असेल तर तुम्ही अस्वस्थ का होता? तुमचा सगळ्यांचा काही हात आहे का? असा थेट सवाल राऊत यांनी केला.