युद्ध समाप्ती केव्हा? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली डेडलाईन !! उद्या मोठी घोषणा करण्याची शक्यता, इराणचे मात्र दुर्लक्ष...

Foto
वॉशिंगटन : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराणयुद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे रा  ष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या (2 एप्रिल) भारतीय वेळेनुसार पहाटे 6:30 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संबोधनात ते इराणयुद्धाच्या समाप्तीची अधिकृत घोषणा करू शकतात, अशी दाट शक्यता आहे. ट्रम्प यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की अमेरिकेने आपले लष्करी उद्दिष्ट साध्य केले आहे. विशेष म्हणजे, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला होर्मुजचा जलमार्ग खुला असो वा बंद, त्याने अमेरिकेला काही फरक पडत नाही, असे धाडसी विधान त्यांनी केले आहे. ट्रम्प यांच्या युद्ध 2-3 आठवड्यात संपेल या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

चीन-पाकिस्तानचा पंचसूत्री शांती प्रस्ताव
एकीकडे अमेरिका घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच, 31 मार्च रोजी बीजिंगमध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे इशाक डार यांनी इराण युद्धावर पंचसूत्री शांतता योजना मांडली आहे. यात तात्काळ युद्धबंदी आणि चर्चेवर भर दिला आहे. इराणने पाकिस्तानच्या थेट मध्यस्थीला विरोध केला असला, तरी शांततेच्या आवाहनाचे स्वागत केले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि ईराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध आता फार काळ चालणार नाही, असे संकेत दिले आहेत. पुढील 2 ते 3 आठवड्यांत, हा संघर्ष संपुष्टात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे विधान खरे ठरले तर साधारणपणे 21 एप्रिलपर्यंत हा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपले बहुतांश लष्करी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता हे युद्ध सुरू ठेवण्याचे कुठलेही ठोस कारण शिल्लक राहिलेले नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

काय म्हणाले ट्रम्प 
इराण युद्धासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका कोणत्याही औपचारिक कराराशिवाय या संघर्षातून बाहेर पडू शकते. अमेरिकेकडे या परिस्थितीत जास्त काळ राहण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. कालावधीचा उल्लेख करत ते म्हणाले, आपण शक्यतो दोन ते तीन आठवड्यांत या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. मात्र याचवेळी, ते पुढे म्हणाले, या काळात इराणसोबत करार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या मते, जर तेहरानची इच्छा असेल तर या काळात करार होऊ शकतो. मात्र, युद्ध संपवण्यासाठी करार करणे अनिवार्य नाही. ट्रम्प यांच्या विधानावरून, यासंदर्भात अमेरिका लवचिक भूमिका घेत असल्याचे दिसते. 

काय म्हणाले नेतन्याहू? -
दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या मोहिमेचे समर्थन केले. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे ईराणची सत्ता पद्धतशीरपणे मोडीत निघत आहे. ईराणने लष्करी महत्त्वाकांक्षेवर खर्च केलेले अब्जावधी डॉलर्स पाण्यात गेले आहेत. ईराण आता कमालीचा कमकुवत झाला आहे तर इस्रायल अधिक मजबूत झाला आहे, असेही नेतन्याहू म्हणाले.

लष्करी कारवाईचे संकेत?
दुसरीकडे, युएई होर्मुजचा जलमार्ग सुरू करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी टाइम्स ऑफ इस्रायलने दिली आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय लष्करी युती करण्याची तयारीही सुरू आहे.