नवी दिल्ली : देशातील एटीएममध्ये यावेळी रोख रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती कॉन्फडेरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने इंडियन बँक असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे देशातील एटीएमवरच नाही तर नागरिकांवर नवीन संकट आले आहे. रोख रक्कमेच्या तुटवड्यामुळे अनेक एटीएमची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, पूर्वीच्या तुलनेत एटीएमचे व्यवहार कमी झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ऐन पेरणीच्यावेळी रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा रोख रक्कमेचा तुटवडा
उपलब्ध आकड्यांनुसार, सर्व एटीएममध्ये रोख रक्कमेचा तुटवडा जाणवला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात एकूण ९४,००० कोटी रुपयांची आवश्यकता होती. पण मार्च महिन्यात केवळ ६१,००० कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यात केवळ ५४,००० कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे ही मोठी तफावत समोर आली होती. तर मे महिन्यातही ग्रामीण भागातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा जाणवला. राज्यातील काही जिल्ह्यात याविषयीची ओरड करण्यात आली होती. तर मराठवाड्यातील एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. अनेक एटीएमवर जात शिवसैनिकांनी ५०० रुपयांच्या नोटा येत नसल्याचे डेमो दाखवले होते. तर याप्रकरणी बँकेच्या अधिकार्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
एटीएम इंडस्ट्रीजची मोठी माहिती
आयबीएला सीएटी एमआयने पत्र लिहिले आहे. त्यानुसार देशातील अनेक राज्यातील बँकांच्या शाखांमधील एटीएममधून रोख रक्कम निघत नसल्याचे म्हटले आहे. ग्रामीण आणि निम्नशहरी भागातील एटीएममध्ये रोख रक्कमेची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे एटीएम इंडस्ट्रीने म्हटले आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलन विभागाला याविषयीची माहिती दिली आहे.