नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. दीपके यांनी लहरा दो तिरंगा हे आंदोलन छेडलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी दीपकेंविरोधात कोणते गुन्हे दाखल केले? आता पोलिसांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. तर दिल्ली पोलिसांनी दीपकेंना किडनॅप केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली, नेहा बोरा यांना काल ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही नेत्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले होते. त्यांना कायदेविषयक मदत करू दिली जात नसल्याचा आरोप सीजेपीने रात्री उशिरा केला. त्याबाबत दिल्ली पोलिसांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना आज (शनिवारी) नंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
एएनआयच्या दाव्यानुसार, अभिजीत दीपके यांच्यावर बीएनएसएसच्या कलम १२६/१७० अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शांततेचा भंग किंवा शांतता बिघडण्याची शक्यता म्हणून हे कलम लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस आता दीपकेंना आज एसईएम कोर्टात हजर करणार आहे. विशेष म्हणजे, एक वर्षभर शांतता भंग करणार नाही, या अटीवर कोर्टाने मागच्यावेळी दीपकेंना सोडलं होतं. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोलिसांनी काय म्हटलं?
१६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा आणि कार्यकर्ते अभिजीत दीपके यांना संबंधित कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस अधिनियमांच्या कलम ६५ अंतर्गत औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेहा बोराला सोडून देण्यात आलं आहे. तर दीपकेंच्या विरोधात च्या कलम १२६/१७० अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
सीजेपीचा आरोप काय?
यावेळी सीजेपीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपके हे आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी घराच्या बाहेर फेरफटका मारत असताना त्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना किडनॅप केलं आहे, असं सीजेपीने म्हटलं आहे. दिल्ली पोलीस दीपकेंना अज्ञात स्थळी घेऊन गेली आहे. आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांना वकिलांशी बोलण्याचीही परवानगी दिली जात नसल्याचं सीजेपीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सीजेपीची मोदी-शाहांवर टीका
अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मोदी आणि शाह आणखी किती लोकांना अटक करणार आहे? असा प्रश्न विचारताना सीजेपीने म्हटले की, अभिजीत दिपकेंना अवैधपणे ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक अटकेनंतर आणखी युवक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला. दुसर्या एका पोस्टमध्ये सीजेपीने म्हटले की, राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या तरुणांना हे सरकार इतके का घाबरते? या वाक्यानंतर हुकूमशाह असा एक शब्द लिहिण्यात आला आहे.