ठाणे: राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याचा अवधी संपण्यास काही तासांचा अवधी शिल्लक आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी शमण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे विजयासाठीच्या मतांची आकडेमोड सुरू झाली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या पहिल्या जागेवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून अत्यंत धक्कादायक आणि मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पवार यांनी ऐन वेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी करणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेला हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अत्यंत मोठी आणि मास्टरस्ट्रोक खेळी मानली जात आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असून, तिथे विरोधकांचा उमेदवार मैदानातून मागे घ्यायला लावणे ही महायुतीसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे.
ठाण्यात पहिल्यांदाच बिनविरोध निवडणूक...
ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात ही निवडणूक बिनविरोध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजवर या मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे, मात्र अभिजीत पवारांच्या माघारीमुळे यावेळी इतिहास बदलला आहे. रवींद्र फाटक आता थेट बिनविरोध आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार आहेत. मतदान प्रक्रियेपूर्वीच मविआने टाकलेल्या या शस्त्रामुळे ठाण्यातील विरोधकांच्या गोटात मोठी शांतता पसरली आहे.
उमेदवारी मागे का घेतली?
ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे निर्णायक मतदान होते. भाजपने संख्याबळाच्या आधारे या जागेवर दावा केला होता. महाविकास आघाडीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचा दावा सातत्याने सत्ताधारी बाकांवरून करण्यात येत होता. आता, अभिजीत पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने चर्चांना उधाण आले. तर, दुसरीकडे अभिजीत पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव उमेदवारी मागे घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.