स्थायी समितीचा सभापती कोण? भाजपच्या राजू शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा !

Foto
औरंगाबाद : मनपातील महत्वाची व  ‘अर्थ’ पूर्ण अशी समिती मानल्या जाणाऱ्या  स्थायी समितीतील आठ सदस्य एप्रिल अखेरीस निवृत्त होत असल्याने  रिक्त होणाऱ्या जागांवर नुकतीच नवीन 8 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य निवडीनंतर आता स्थायी समितीचा सभापती कोण? यावरून चर्चेला उधाण आले असून, नव्यानेच स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून गेलेले भाजपचे राजू शिंदे हेच सभापती होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे. मनपातील अर्थपूर्ण समिती म्हणून ओळख असलेल्या  स्थायी समिती मधील 16 सदस्यांपैकी 8 सदस्य निवृत्त होत असला आहे. त्यांच्या रिक्त जागांवर  8 नवीन सदस्यांची निवड करण्यात नुकतीच करण्यात आलेली आहे. 

यात शिवसेने कडून सचिन खैरे, कमलाकर जगताप, सीमा चक्रनारायण, राजेंद्र जंजाळ, सुरेखा सानप, भाजपाकडून राजू शिंदे, तर  एमआयएम कडून नासिर सिद्दिकी, सय्यदा बेगम  आदींची वर्णी लागलेली आहे. आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीचा सभापती कोण ? याकडे लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया पडण्याची शक्यता असून, यंदाचे सभापतीपद हे भाजपच्या वाट्याला येणार असल्याने सदस्य निवड होताच अनेकांच्या नावाची चर्चा मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे. यात गजानन बारवाल, पुनम बमणे, व नुकतीच सदस्य म्हणून निवड झालेले राजू शिंदे आदींचा सामावेश आहे. बमणे हे सभापती पदाचे दावेदार होते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीचे उमेदवार खासदार खैरे यांचा प्रचार केला नसल्याची चर्चा सध्या असल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे. या यादीत सध्या  शिंदे यांचे नाव आघाडीवर असून, तेच सभापती होणार असल्याची चर्चा सध्या मनपा वर्तुळात ऐकायला मिळत आहे.