विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अन् पेलेट गनचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींचे गृहमंत्र्यांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Foto
नवी दिल्ली : दिल्लीत पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज कारवाईवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत. २० जुलै रोजी झालेल्या या घटनेबाबत उत्तर देण्याची मागणी करत राहुल गांधींनी गृहमंत्रालयाला दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबतचे त्यांनी पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

देशातील तरुण आणि विद्यार्थी न्यायाच्या व पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांनी त्यांच्यावर अमानुष बळप्रयोग केला. यामध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज आणि थेट पेलेट गन चा वापर करण्यात आला. या हिंसाचारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून महिला विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप या पत्रात राहुल गांधी यांनी केला आहे.

साध्या वेशातील मारहाण करणारे कोण होते?
या पत्रात राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, पेलेट गनच्या गोळीबारामुळे १९ वर्षांचा साहिल लोचब हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याचा एक डोळा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पत्रकार आणि इतर नागरिकांनाही या दडपशाहीचा फटका बसला आहे, असेही गांधी यांनी यामध्ये म्हटले आहे. दिल्लीतील सुरक्षा दले ही थेट गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने राहुल गांधींनी अमित शाह यांना सवाल केले आहेत. गृहमंत्री म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि अमानुष बळ वापरण्यास मंजुरी दिली होती का? आणि साध्या कपड्यात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक नेमके पोलीस होते की स्वयंसेवक?, असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.

शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा पाया असून, तरुणांचा आवाज दाबण्याऐवजी सरकारने संवादाने प्रश्न सोडवले पाहिजेत, असा टोलाही गांधींनी लगावला आहे. राहुल गांधींच्या या पत्रामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.