छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील कचऱ्याचे कंत्राट घेतलेल्या गुजरातमधील वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीने सलीम अली सरोवर परिसरातील घंटागाड्यांच्या पार्किंगच्या जागेत शेड उभारण्यासाठी विनापरवानगी झाडांची कत्तल केली. बुधवारी (दि. 28) दुपारी ही घटना समोर आली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. याप्रकरणी कंपनीला नोटीस बजावण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या घटनेस आता पाच दिवस झाले तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला नोटीस बजावण्याचे धाडस केले नाही. या घटनेकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा होत आहे.
शहरातील ऑक्सीजन हब असलेल्या सलीम अली सरोवर परिसरात महापालिकेने कचरा संकलन व वाहतूक करणारा जुना कंत्राटदार रेड्डी कंपनीला घंटागाड्या उभ्या करण्यासाठी जागा दिलेली आहे. या जागेत घंटागाड्या पार्क केल्या जात होत्या. रेड्डी कंपनीसोबतचा करार संपलेला आहे. तर महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून गुजरातमधील वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीला 10 वर्षांसाठी कचऱ्याचे कंत्राट दिले आहे.
कंपनी 1 फेब्रुवारीपासून काम सुरू करणार होती, मात्र काही कारणांमुळे दोन महिन्यांची मुदतवाढ रेड्डी कंपनीला दिली आहे. तर गुजरातच्या कंपनीनेही सर्वेसह इतर कामे सुरू केली आहेत. सलीम अली सरोवरसमोरील जागेतील 10-12 झाडे कंपनीच्या कामगारांनी शेड उभारण्यासाठी तोडली. विशेष म्हणजे झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगीही घेतली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी कर्मचारी पाठवून पाहणी केली, तसेच उद्यान विभागालाही पाहणी करण्याची सूचना केली. उद्यान विभागाचे कृषी सहाय्यक पवनकुमार यांनीही पाहणी केली, मात्र पंचनामा अहवाल न आल्याने पुढील कार्यवाही झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.











