मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीएमसी पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील या पक्षात मोठी फूट पडली आहे. २०२२ साली महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात फूट पडली होती. उद्धव ठाकरे यांनी उद्धवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली. तर काही खासदार प्रत्यक्ष येऊ न शकल्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. यामध्ये संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर यांचा समावेश आहे. संजय देशमुख यांच्या कन्येचा विवाह होणार आहे. त्यामुळे ते मुंबईला येऊ शकले नाहीत. तर, नागेश पाटील-आष्टीकर हे सध्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे बोलावूनही कोण आले नाहीत?
खासदार भाऊसाहेब वाकचौरे 'नॉट रिचेबल' असल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांपासून वाकचौरे कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असून, त्यांचे स्वीय सहाय्यक सोबत नाहीत. त्यांच्या या गूढ गैरहजेरीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर या बैठकीला ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही पद्धतीने उपस्थित राहू शकलेले नाहीत. ते पुण्यात असून, याबाबतचा निरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांच्याकडे पाठवला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या 'धोंडे जेवणाच्या' कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ते ऑपरेशन टायगर करणार असले तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू. अशी बैठक म्हणजे कोणत्याही पक्षात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. अशा बैठका मातोश्रीवर सातत्याने होत असतात. पुढच्या महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. सगळ्या खासदारांना बोलावून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले होते.