मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयाला हवा दिल्यानंतर या विषयाला फोडणी मिळाली आहे. त्यातच अजितदादा गटाचे आमदार आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याने विलिनीकरणाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला तयार नसल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवार यांना पक्षावरील आपले नियंत्रण घालवायचे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अडले असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतीलच, या एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली. पण आता पुन्हा एकदा आपला पक्ष आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि पक्षाची एकजूट कायम ठेवण्यासाठी शरद पवार सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. ङ्गइंडियन एक्सप्रेसफने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपला संसदेत आपली स्थिती भक्कम करायची आहे. तसेच विरोधकांना कमकुवत करायचं आहे. त्यासाठी भाजपला शरद पवार आणि त्यांच्या लोकसभा खासदारांचं समर्थन हवं आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. त्यानंतर पवार आणि पटेल यांची पुन्हा भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपचाच आग्रह
सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एनसीपीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना विलिनीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्याचा आग्रह धरला आहे. या बैठकीपासून सुनेत्रा पवारांना दूर ठेवण्यात आले होते. त्यावरून भाजप आपली ही योजना पुढे नेण्यासाठी एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांनाच पुढे करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
पवार विचारधारा सोडून येतील?
विलिनीकरण झाले तर पक्षावरील आपलं नियंत्रण निघून जाईल याची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार आपली धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडून मोदी आणि शाहांच्या नेतृत्त्वात काम करण्यास तयार होतील का? असा सवाल केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपले पर्याय खुले ठेवले असल्याचंही सांगण्यात येत असल्याचं या वृत्तात म्हटले आहे.
भाजपला शुभेच्छा
शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना महत्त्वाची जबाबदारी द्यायची आहे. त्यांना सेट करायचं आहे. तसेच एनसीपीची जी कायदेशीर लढाई सुरू आहे, ती लढाई आपणच जिंकू, असा पवारांना विश्वास आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. पवार असे नेते आहेत की त्यांचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम आहे, असे मानले जात नाही. जर इतक्या महत्त्वाच्या विषयावर शरद पवार यांच्या राजकीय गणितावर भाजपला आजही विश्वास असेल तर त्याच्या त्यांना शुभेच्छा, असं या नेत्याने म्हटले आहे.
दादांच्या गटाचे २२ आमदार कधीही पक्ष सोडू शकतात : संजय राऊत
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २० ते २२ आमदार लवकरच बाहेर पडणार आहेत. हे आमदार एकतर आपल्या मूळ पक्षात परततील किंवा निवडणुकीपूर्वी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करतील, असे राऊत यांनी म्हटले आहे. या दाव्याला पूरक अशा घटनाही घडत आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे.
नुकतीच जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची तासभर भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील काही आमदारांनीही शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत स्थिती आणि भविष्यातील राजकीय समीकरणे चर्चेचा विषय बनली आहेत.