शिवसेना कुणाची? या महिन्यात लागणार अंतिम निकाल; संजय राऊत यांनी दिली मोठी अपडेट

Foto
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवार किंवा गुरुवारी ही सुनावणी संपणार आहे. त्यामुळे शिवसेनेबाबतचा निकाल कधी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे. शिवसेनेच्या प्रकरणावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, असा अंदाज संजय राऊत यांनी वर्तवला आहे. त्यामुळे कोर्ट काय निकाल देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या कालच्या युक्तिवादावर भाष्य केलं. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जे सांगितलं ते सत्य आहे. शिवसेनेला सुरूंग लावण्याचं भाजपचं कारस्थान आधीच ठरलं होतं. त्यात हे लोकं सहभागी होते. आता हळूहळू त्या कटकारस्थानाची सर्व पानं सर्वोच्च न्यायालयात उलगडत गेली आहेत. सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे. सिब्बल अजून एखादा दिवस घेतील. त्यानंतर हा खटला क्लोज फॉर ऑर्डर स्टेजला येईल. माझ्या आकलानाप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेल. या निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

लोकशाहीला कलंक
अशा पद्धतीने आमदार खासदार फोडून सरकार बनवत राहिले आणि त्याला निवडणूक आयोगाचं पाठबळ मिळत गेलं तर या देशातील कोणतंही सरकार स्थिर राहणार नाही, हे राजकीय सत्य सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. अमित शाह आणि कंपनी पैशाच्या बळावर आमदार, खासदार, विजय, आणि सरकार विकत घेऊ शकतात ही जर लोकशाही असेल तर भारताचं संविधान आणि लोकशाहीच्या व्याख्येला कलंक लागला, असं आम्ही मानतो. पण सर्वोच्च न्यायालयाने योग्य निकाल दिला तर कदाचित भविष्यात अशा प्रकारचं लोकशाहीच्या दृष्टीने बेकायदेशीर कृत्य करायला कुणीही धजवाणार नाही. म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात लोकशाही वाचवण्यासाठी याचिका घेऊन गेलो होतो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

तोपर्यंत भारत महासत्ता नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बैठकीचा एक फोटो शेअर करून काँग्रेसचा पंतप्रधान असता तर या टेबलवर दिसला असता, असं ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटचं राऊत यांनी समर्थन केलं आहे. पुतीन, ट्रम्प आणि जिनपिंग या तीन महासत्ता आहेत. रशिया, अमेरिका आणि चीन या जगातील तीन अधिकृत महासत्ता आहेत. मोदी उगाच आम्ही महासत्ता आहोत, असं म्हणत डबड वाजवत फिरत आहेत. डमरू वाजवत आहेत. ते खरंच महासत्ता असता तर त्यात चौथा देश भारत असता. दुर्देवाने मोदी आणि शाह राज्य करत असे पर्यंत भारत चौथा देश होऊ शकत नाही. भारताची महासत्ता होण्याची क्षमता असतानाही मोदी आणि शाह यांनी हा देश रसातळाला नेला आहे, असा हल्लाच त्यांनी केला.

सावरकरांना भारतरत्न का देत नाही?
सावरकर यांच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावरकर हे आमचे हिरो आहेत. या सर्व फालतू लढाया लढण्यापेक्षा सावरकरांना भारतरत्न द्या आणि त्यांचा गौरव करा. का देत नाही? १२ वर्ष झाले मोदी येऊन आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. का भारतरत्न देत नाही? सावरकरांचा गौरव का होत नाही? अडचण काय आहे? ऐर्‍यागैर्‍यांना भारतरत्न दिलं. पण सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.

दमडीही मिळणार नाही
केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळासाठी फक्त एक हजार कोटी दिले आहेत. केंद्र दमडीही देणार नाही. गुजरातला दुष्काळ असता तर एक लाख कोटी गेले असते. उत्तर प्रदेशात दुष्काळ झाला असता तर तिथेही पैसा गेला असता. मुंबईत बिल्डरांनी एसआरए घोटाळा केला. त्यांच्याकडून पैसे वसूल करा. तुमच्या दरबारातील लोक आहेत. फडणवीस हे एसआरए या ऑथेरिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष असलेल्या संस्थेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. १ हजार कोटी आले. तेही चार ते पाच टप्प्यात मिळणार आहे. एक रकमी मिळणार नाही. ४० हजार कोटी मिळेपर्यंत पुढचा पावसाळा उजाडेल. ते मिळणारच नाही. त्यामुळे बिल्डरांकडून पैसे वसूल करा ना, असं आव्हानच त्यांनी दिलं.