हा पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही..! खैरे यांचे भावनिक उद्गार

Foto

औरंगाबाद: गेली २० वर्ष मी संभाजीनगरचा खासदार होतो. लोकांची कुठलीही कामे मी तत्परतेने केली. असे कोणते वाईट काम मी केले ज्यामुळे तुम्ही माझा पराभव केला. हा पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही, असे भावनिक उद्गार  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. शिवसेनेच्या औरंगाबाद येथील शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पहिल्यांदाच खैरे आपल्या परभवाविषयी बोलले. 

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर त्रिंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख मनीषा कायंदे, माजी आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाठ, नगरसेवक ऋशिकेष खैरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा आपल्याला मुसंडी मारायची आहे. जे झालं ते विसरून जा. गटातटामधे आता भांडत बसू नका. आपण सर्वजण हिंदू म्हणून एकत्र येवूयात. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. विधानसभेला आपल्यलाला शिवसेनाचा भगवा फडकवायचा आहे असेही खैरे यावेळी म्हणाले.  

कर्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हि रात्रंदिवस काम करणारी संघटना असून आपली बांधिलकी ही लोकांशी असली पाहिजे. महाराष्ट्रात सेनेच्या १८ जागा आल्या मात्र औरंगाबादची जागा गेल्याने 'गड आला पण सिंह' गेल्याची भावना शिवसैनिकांची होती असे शिंदे यावेळी म्हणाले. शिवसेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केली मात्र सेने संपवण्याची भाषा करणारे स्वतःच संपले, काळाच्या पडद्याआड गेले असेही शिंदे म्हणाले. 

पक्षसंघटनेत फेरबदलाचे संकेत

औरंगाबाद लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पक्षसंघटनेट फेरबदल करण्याची गरज आल्याची भावना आ. संजय शिसाठ यांसह अनेक वक्त्यांनी बोलून दाखवली. या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील खो दिल्याने लवकरच पक्षसंघटनेत मोठे फेरबदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे.