कठुआ : जम्मू-कश्मीरमधील कठुआमध्ये हादरवून टाकणारी आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बसोहली परिसरातील मश्का गावात असलेल्या सेवा हायडल-२ वीज प्रकल्पावर तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने आपल्याच वरिष्ठांवर आणि सहकार्यांवर एके-४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका असिस्टंट कमांडंटसह चार कर्मचारी जागीच ठार झाले आहेत.
लहान मुलाला प्रकल्पावर आणण्यावरुन वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधेश कुमार सिंग असे गोळीबार करणार्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव असून, तो आणि त्याची पत्नी दोघेही सीआयएएफमध्ये नोकरी करतात. आरोपी अवधेश कुमार सिंग आणि सहकारी तसेच कंपनी कमांडर अंकित कुमार पांडे यांच्यात लहान मुलाला वारंवार प्रकल्पाच्या ठिकाणी आणण्यावरून वाद झाला होता.
पती-पत्नी दोघेही त्याच प्रकल्पावर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत होते. त्यामुळे ड्युटीवर येताना किंवा घरी परतताना ते त्यांच्या लहान बाळाला एकमेकांकडे सोपवण्यासाठी प्रकल्पाच्या आवारात घेऊन येत असत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कार्यालयात किंवा प्रकल्पाच्या ठिकाणी लहान मुलाला आणण्यास मनाई करण्यात आली होती.
एके-४७ रायफलने बेछुट गोळीबार
मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा त्या दोघांपैकी एकाने लहान मुलाला ड्युटीच्या ठिकाणी आणले. याची तक्रार कोणीतरी थेट कंपनी कमांडर यांच्याकडे केली. यावरून पांडे यांनी आरोपी जवानाला जाब विचारला, ज्यावरून दोघांमध्ये बाचाबाची आणि वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापलेल्या अवधेश कुमार सिंगने आपली एके-४७ रायफल काढली, ज्यामध्ये १५० काडतुसे भरलेली होती आणि त्याने बेछूट गोळीबार सुरू केला.
चौघांचा जागीच मृत्यू
या अचानक झालेल्या हल्ल्यात असिस्टेंट कमांडंट अंकित कुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग, कॉन्स्टेबल संजीव कुमार आणि मोहम्मद रफीक यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण वीज प्रकल्प परिसर सुरक्षित केला. ज्या मश्का गावात ही घटना घडली तो चंबा जिल्ह्याला लागून असल्यामुळे, जखमींना उपचारासाठी तातडीने हिमाचल प्रदेशच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चारही जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोर कॉन्स्टेबल अवधेश कुमार सिंग याला तात्काळ अटक केली.