नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंनी तीन मुलं जन्माला घालावीत असं आवाहन केलं आहे. त्याबाबत आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक यांनी स्वतः लग्न करुन मुलं जन्माला का घालत नाहीत? असा प्रश्न विचारत अविमुक्तेश्वरानंद यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद?
बरेली येथील देवभूमी आयटीआयला अविमुक्तेश्वरानंद यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. हिंदू लोकसंख्येच्या मुद्द्यावरुन मोहन भागवत यांनी जे आवाहन केलं होतं त्याबाबत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, लोकसंख्येचा स्फोट होत आहे असं सरकारकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे आरएसएसचे लोक लोकसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करत आहेत. हिंदूंची लोकसंख्या वाढवणं इतकं मोठं काम असेल तर दुसर्यांवर मोहन भागवत ओझं का टाकत आहेत आधी तुम्ही लग्न करा, मुलं जन्माला घाला मग दुसर्यांना सांगा असं म्हणत अविमुक्तेश्वरानंद यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.
अविमुक्तेश्वरानंद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
अविमुक्तेश्वरानंद यांनी इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. युद्ध होतं तेव्हा दोन पक्ष असतात एक न्यायाचा आणि दुसराअन्यायचा. अशा वेळी विद्वानांनी न्याय्य बाजू कुठली आणि अन्यायी बाजू कुठली हे जगाला ठणकावून सांगितलं पाहिजे. मात्र आपल्या देशाने कधीही आजपर्यंत या युद्धात कुणाची एकाची बाजू घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, त्यांचं हे मौन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारं आहे असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. युद्धामुळे गॅस सिलिंडर मिळत नाहीयेत, पंतप्रधान मोदींना त्याचं काही सोयर सुतक नाही. त्यांच्या बंगल्याची वीज जात नाही किंवा रेशन कमी होत नाही. त्यांच्यासाठी सगळं उत्तम चाललं आहे जनता मात्र त्रस्त झाली आहे असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.