औरंगाबाद : यंदा राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याला टँकर आणि मागेल त्याला छावणी देण्यास शासनाचे प्राधान्य आहे, अशी माहिती महसूल तथा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शहराजवळील करमाड येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीला महसूलमंत्री पाटील यांनी आज रविवारी सकाळी भेट दिली. यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार अतुल सावे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, नगरसेवक राजू शिंदे आदींसह पशुपालक शेतकरी उपस्थित होते. पाटील म्हणाले, गतवर्षी झालेल्या अपुर्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, पशुपालकांना शासनाकडून आवश्यक ती मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. चारा छावण्यांना लागणारे पाण्याचे टँकर शासनाकडून पुरविण्यात येत आहे.
त्यामुळे चारा छावणी मालकांचा पाण्याचा खर्चही शासन स्तरावरून होत आहे. शिवाय, प्रति जनावर शासनाकडून 100 रुपयांचे अनुदानही चाराछावणीमालकांना शासन देत आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 70 रुपये तर राज्य शासनाकडून 30 रुपये असे एकूण 100 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. शेळ्या, मेंढ्यांच्या छावण्या सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. आगामी काळात सर्वांनी वृक्ष लागवड करावी. पाण्याचा जपून वापर करावा. शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.सुरुवातीला पाटील यांनी चारा छावणीची पाहणी करून दुधड येथील पशुपालक एकनाथ चौधरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. चारा छावणीत दाखल केलेल्या बैलांना शेतावर पेरणीसाठी नेता येऊ शकते, असे पशुपालकांना सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकर्यांना अल्प किमतीत बाजार समितीकडून छावणीच्या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बागडे यांनी पाटील यांना दिली.
छावणीत दोन हजार जनावरे....
करमाडच्या चारा छावणीत आजूबाजूच्या 35 खेड्यांतील दोन हजार जनावरे आहेत. शासनाच्या निर्णयानुसार मुबलक चारा, पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. चार्यासाठी आवश्यक कुटी यंत्र, मनुष्यबळाची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे बाजार समितीचे सभापती पठाडे यांनी सांगितले.