महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारणीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आ. अब्दुल सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी), तालुक्यातील धोत्रा येथे गोळेगाव - शिवना चौकात क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, पुतळा उभारणीच्या कामासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. तसेच या कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. 

धोत्रा येथील ग्रामस्थांच्या भावना आणि अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेता, महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारणीचा विषय मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया व मंजुरीसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. 

पुतळा उभारणीमुळे गावाच्या वैभवात भर पडण्यासोबतच महाराणा प्रतापसिंह यांचे शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास नव्या पिढीला समजण्यास मदत होणार आहे. महाराणा प्रतापसिंह यांचे जीवन हे धैर्य, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे धोत्रा ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.