सिल्लोड, (प्रतिनिधी) : आपला भारत देश सर्वधर्म समभाव जपणारा देश आहे. भारतात सर्व धार्माचे जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात मात्र काही राजकीय पक्ष देशात धार्मिक अराजकता निर्माण करू पाहत असून अश्या नाजीया इलाही सारख्या महिलांना पुढे करीत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सिल्लोड तालुका सचिव कॉ सय्यद अनिस यांनी करीत जातीय सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी नाझिया इलाहीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण तिने प्रेषित मुहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीचा अपमान करून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
तिला कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात असे वक्तव्य करण्याचे धाडस तिच्याकडून होऊ नये. आम्ही काहीही सहन करू शकतो मात्र आमच्या पैगंबराचा कोणताही अपमान सहन करणार नाही असा इशारा कॉ सय्यद अनिस यांनी दिला. यावेळी मौलाना अख्तर, मौलाना शमशाद रझवी, कॉ त्र्यंबक शेजूळ, शेख अजिम यांनी देखील आपल्या भाषणात नाजीया इलाही हिच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी तहसील कार्यालयासमोर नाजीया इलाही हिच्या वक्तव्याविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून नायब तहसीलदार मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसाहित हिंदू बांधवांची उपस्थिती होती.
भाकप तर्फे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे सिल्लोड तालुक्यातील व शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप आहे. प्रेषित पैगंबर हजरत मुहम्मद तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्या संदर्भात कथितरीत्या अवमानकारक व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये नाझीया इलाही खान यांनी केली आहे.
संबंधित व्हिडिओमधील कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असून समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने समाजामध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील लागू असलेल्या सर्व संबंधित कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारचे समाजात तेढ निर्माण करणारे व धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होऊ नयेत, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधित व्हिडिओ हटविण्याची कार्यवाही करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती :
शेख इसाक, शेख फेरोज, इरफान पठाण, देविदास दांडगे, बाळू पाटील शिन्दे, केशवराव ढोरमारे, हमिद पठाण, फहिम पठाण, सुनिता दांडगे, शेख अजिम, दादाराव सोनवणे, शेख शाकेर, शेख बाबा, शेख सोहेल, शेख आसीम, सुभान पठाण, शेख इमरान, शेख नदिम यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.