अजितदादांच्या अपघातावर संजय राऊत यांचे प्रश्चिन्ह... मृत्यूबाबत संसदेत मुद्दा मांडणार : संजय राऊतांचा सनसनाटी दावा

Foto
मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला होता. आता या अपघाताबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सनसनाटी दावा करताना हा मुद्दा आपण संसदेत उचलणार असल्याचे ते म्हणाले.
 
दरम्यान माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन असे अजित पवार यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे, तसेच निमानात सहा जण होते असे सांगितले जाते मग सहाव्या व्यक्तीचा मृतदेह का सापडला नाही? असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. भाजपाने त्यांच्यावर काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले. ईडी-सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी करतात, तेच त्यांनी केलं आणि तेवढ्यापुरते ते भाजपाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली शहाणपणाने क्लियर करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड सुरू केली. ती करत असताना त्याआधी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर कधीही काम केलं नाही. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत शरद पवार यांनी पहिल्या दिवशी विधान केलं होतं. मात्र हळूहळू त्यांनाही कळेल की हे प्रकरण साधं नाही आहे. अजित पवार यांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. तो देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला असता. तसेच भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती. माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, असे अजित पवार हे वारंवार सांगत होते. मी त्या फाईल उघड करीन असे त्यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे. मला या प्रकरणात जस्टिस लोया यांची आठवण आली. मी कोणावर आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. ते मी वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांच्या मनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विचार असेल तर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली असती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरूनही संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही. अजित पवार हे स्वत:च्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते स्वत:च्या मर्जीने भाजपासोबत गेले होते. पुढे भाजपा हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही, असे त्यांना वाटले असावे. आता अजित पवार हे फडणवीसांबाबत खाजगीत बरंच काही बोलायचे, असा दावा आम्ही केला तर. जर अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच अजित  पवार यांना स्वगृही जायचं असेल तर त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरजच काय होती, असा सावलही राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष आता पवार-पाटील यांचा पक्ष राहिलेला नाही. तो पक्ष आता गोयल, पटेल, पारेख यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजितदादांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहर्‍याचा पक्ष होता. तो मूळ पक्ष शरद पवार यांचाच पण दरोडा टाकून तो अमित शाहा यांनी अजित पवार यांच्याकडे दिला. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपाने गिळून टाकला आहे. याबाबत त्या पक्षातील मराठी आमदार, खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वत:ला मराठी समजू नये, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.