मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे लागल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिंदेसेनेने महापौरपदावर आपला दावा ठोकल्याची चर्चा आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार असल्याचे म्हटले. तसेच सत्तेची खुर्ची महत्त्वाची नसून मुंबईकरांना काय देणार हा अजेंडा असल्याचे म्हटले.
२३ जानेवारी २०२६ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या ऐतिहासिक वर्षात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवावा आणि शिवसेनेचाच महापौर असावा, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली होती. दुसरीकडे भाजपने ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे महापौरपदावर आपला हक्क सांगितला आहे. एकनाथ शिंदेंनी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला सुचवला असला तरी, भाजप आपलाच महापौर व्हावा यावर ठाम असल्याचे दिसते.
एकनाथ शिंदेंची भूमिका
महापौरपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संतापून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल. आमची युती आहे. त्यांच्यासारखी याला खड्ड्यात घाल त्याला खड्ड्यात घाल अशी युती नाही. खुर्ची आणि सत्ता हा आमचा अजेंडा नाही. आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत हे महत्त्वाचे आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आता या पाच वर्षांमध्ये मुंबईला जागतिक स्तरावरील शहरासारखी करणार. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की मुंबईल फिनटेक कॅपिटल करणार. मुंबई जागतिक आर्थिक केंद्र झालं पाहिजे असं ते म्हणाले. पण विरोधकांकडून लगेच आरडाओरड सुरु झाली की, मुंबई तोडणार. पण मराठी माणूस तुमच्यामुळेच बाहेर गेला. मुंबईकरांना जीवनात काय मिळणार हा आमचा अजेंडा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.