वॉशंगटन : आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर नव्याने हल्ला करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र चर्चेचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही. मात्र व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये सुरू असलेल्या वेगवान हालचालींमुळे इराणमध्ये पुन्हा एका मोठ्या सैनिकी हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
या संदर्भातील आणि च्या वृत्तानुसार शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ अधिकार्यांसोबत व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती जेडी वेन्स, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि चीफ ऑफ स्टाफ सूजी वाईल्ससह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते.
मिळत असलेल्या माहितीनुसार अमेरिकन सैन्यदलांच्या काही जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास त्वरित कारवाई करता यावी यासाठी परदेशामध्ये तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी ठिकाणांसाठी रिकॉल रोस्टर अपडेट केलं जात आहे.
यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपले सर्व खाजगी कार्यक्रम रद्द केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प न्यू जर्सी येथील बेडमिंस्टर गोल्फ क्लब येथे जाणार होते. मात्र त्यांनी अचानक आपला विचार बदलून ते वॉशिंग्टनला माघारी परतले. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होणेही टाळले. तसेच सरकारी परिस्थिती आणि अमेरिकेवरील प्रेमामुळे मला व्हाईट हाऊसमध्ये राहणं आवश्यक वाटत आहे, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय सल्लागार डॅन स्केविनो यांनी सोशल मीडियावर बी-२ स्टील्थ बॉम्बर्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या वेळीही अशा प्रकारचा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर पुढच्याच दिवशी अमेरिका आणि इस्राइलने इराणवर हल्ला केला होता, असा दावा अमेरिकन प्रसारमाध्यमांनी केला आहे.