मुंबई : प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडीक्शन सेंटरने केली आहे. यंदा १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असा अंदाज देखील आहे. २०२७ च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय असेल असा कयास बांधला जात आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल निनोच्या परिस्थितीमुळे उद्भवणार्या संकटांकडे लक्ष वेधले असून राज्यांनी जलसंधारणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीदरम्यान हवामानाशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी देशाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या ११वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक पार पडली. सर्व २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी याला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य हवामान संकटांकडे लक्ष वेधले.
हवामान बदलामुळे मोठे आव्हान
हवामानातील बदलांमुळे शेती, जलसाठे आणि उपजीविकेसमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात; त्यामुळे पूर्वतयारी आणि संसाधनांचे दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी मांडले. सरकारच्या निवेदनानुसार, पंतप्रधानांनी विशेषतः एल निनो परिस्थितीच्या संभाव्य प्रभावाविषयी सावध राहण्याचा इशारा दिला आणि राज्यांनी जलसंधारणांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले.
एल निनो म्हणजे काय?
अल निनो ही मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेळोवेळी वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत करण्याशी संबंधित आहे. कारण अल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतात पाऊस कमी पडतो. जागतिक हवामान संघटनेने यासंदर्भात आधीच इशारा दिला आहे.२०२६ च्या मध्यापासून अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामान पद्धतींवर होईल असे म्हटले गेले आहे.
जगभरातील हवामान तज्ज्ञ अल निनोच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अनेक अंदाज यासंदर्भात मांडले गेलेले असताना आता पंतप्रधानांनी अशा वेळी विधान केले आहे. अल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीपेक्षा जास्त असण्याशी संबंधित एक हवामानविषयक घटना आहे, जी भारतासह अनेक देशांतील पावसावर परिणाम करू शकते.
प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन (सीपीसी) सेंटरने गुरुवारी केली. डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून, यंदाचा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता सीपीसीने वर्तवली आहे. सीपीसीने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यंदाचा एल निनो फेब्रुवारी २०२७ मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे सीपीसीच्या अंदाजात म्हटले आहे.