पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा

Foto
 वॉशिंगटन : फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष, त्यात इराणने केलेली होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी आणि त्यापुढे अमेरिकेने सुरू केलेली गस्त यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात भडकू लागले आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे जगभरातील खनिज तेलाच्या किमती आणखीनच  भडकण्याची शक्यता आहे. तसेच खनिज तेलाच्या किमती वाढल्याने भारतासह संपूर्ण जगात  पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचाही भडका उडण्याची शक्यता आहे.
 
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, जागतिक तेलसंकटादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन खनिज तेलाच्या खरेदीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवर देण्यात आलेल्या सवलतीला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही सवलत समाप्त झाली आहे. तसेच ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारत आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल  खरेदी करत होती.  त्यामुळे आता या निर्णयाचा भारतातील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.  

रशिया हा जगातील खनिज तेलाचा प्रमुख  निर्यातदार  देश आहे. त्यामुळे जागतिक  तेल बाजारासाठीही डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे एक मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निर्णयामुळे जगभरातील पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.