नवी दिल्ली : भारतीय राजकारणाच्या पटलावर आगामी काळातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलून टाकणारी एक अत्यंत गुप्त आणि रणनीतिक पटकथा लिहिली जात आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पराभवानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेस हायकमांडने एक अत्यंत मोठा आणि थेट प्रस्ताव दिला आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये पूर्ण विलीनीकरण करावे, अशी थेट ऑफर काँग्रेसने ममता बॅनर्जींना दिला आहे.
विशेष म्हणजे, आज सोमवार (८ जून २०२६) रोजी दुपारी १२:०० वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या असून, पराभवानंतर पहिल्यांदाच त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी थेट चर्चा करणार आहेत.
तृणमूल काँग्रेस चौफेर दबावात; पक्षात मोठी भगदड!
पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सत्ता जाताच बंगालमधील टीएमसीचे वर्चस्व मोडीत निघाले असून, पक्षाचे दुसरे सर्वात मोठे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षात सध्या प्रचंड असंतोष असून तृणमूलचे अनेक खासदार, आमदार आणि तळागाळातील नेते केंद्रीय काँग्रेस नेतृत्वाच्या सतत संपर्कात आहेत. प्रादेशिक पातळीवर एकटे टिकून राहणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानेच ममता बॅनर्जी विलीनीकरणाच्या या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
२ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर आज दिल्लीत इंडियाची बैठक होत आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्या दाव्यानुसार यात २३ विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रविवारीच ममता बॅनर्जींनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.
आघाडीत धुसफूस, मोठे पक्ष दूर
या महाबैठकीपूर्वीच इंडिया आघाडीतील अंतर्गत वाद समोर आले आहेत. आम आदमी पार्टी आणि द्रमुक या बैठकीत सहभागी होणार नाहीत. तर झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवरून काँग्रेसने घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे झारखंड मुक्ती मोर्चा नाराज असून त्यांच्या उपस्थितीवर सस्पेन्स आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जगन रेड्डी यांच्या घरवापसीच्या हालचाली!
काँग्रेस सोडून गेलेल्या जुन्या दिग्गज नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर मोठी घरवापसी मोहीम सुरू केली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये उपेक्षा अनुभवत आहेत. पंजाब भाजप प्रदेशाध्यक्ष ढिल्लन यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज असून, सोनिया गांधींचा एक फोन येताच कॅप्टन यांची काँग्रेसमध्ये घरवापसी निश्चित मानली जात आहे.तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशीही काँग्रेसच्या एका गटाने चर्चा सुरू केली आहे. भूतकाळातील कटू आठवणींमुळे ही वाट सोपी नसली, तरी राजकारणात कोणतेही दरवाजे कायमचे बंद नसतात, यामुळे हे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे.