उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर? मविआची कोंडी वाढली; भाजप देणार नवे चेहरे

Foto
मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-महायुतीला बहुतांश जागा मिळतील असे चित्र आहे. महाविकास आघाडीला फटका बसेल.

विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊजण विधान परिषदेवर मे २०२० मध्ये बिनविरोध निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी महायुतीचे संख्याबळ तब्बल २३५ इतके आहे. मविआकडे माकप, शेकाप मिळून ४८ विधानसभा सदस्य आहेत. अन्य दोन पक्षांचे तीन आमदार आहेत. दोन जागा रिक्त आहेत. मेमधील विधान परिषद निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली तर विधानसभेचे सर्व २८८ आमदार विधान परिषदेसाठी मतदान करतील.

राज्यसभेचे मैदान अगोदर

विधान परिषदेच्या आधी सात जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. त्यात मविआला एक जागा मिळेल, असे संख्याबळ सांगते. ती जागा मविआतील एका पक्षाला दिली गेली, तर दुसर्‍या पक्षाला विधान परिषदेची एक जागा दिली जाईल. भाजपाचे चारपैकी तीन जण गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे नवीन चेहरे पक्षाकडून दिले जातील. सोलापूरच्या राजकारणात गेल्या काळात झालेल्या घडामोडींनंतर दुरावलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाजपा काय निर्णय घेणार ते महत्त्वाचे असेल.

तडजोड करावीच लागणार

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना केली होती; पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविआ एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का, हे महत्त्वाचे असेल.

२० विधानसभा सदस्य असलेल्या उद्धवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस वा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर ठाकरे विधान परिषदेवर जाणार असा त्याचा अर्थ असू शकेल. मविआतील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची हे आव्हान भाजपसमोर असेल.

हे नऊ आमदार जिंकले होते

उद्धव ठाकरे (उद्धवसेना), डॉ. नीलम गोन्हे (तेव्हा उद्धवसेना आता शिंदेसेना), शशिकांत शिंदे (शरद पवार गट), अमोल मिटकरी (अजित पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते, आणि रमेश कराड (भाजप).