राज्यसभेवरुन आघाडीत तणाव वाढणार? उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शरद पवार गटाला वगळून थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

Foto
मुंबई : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बाजूला ठेवत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
  
दरम्यान राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पुढील काही दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू केली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांचा कोटा आवश्यक आहे.

मविआकडे ५० आमदार

सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीकडे ५० आमदारांचे बळ आहे. त्यामुळे सात पैकी किमान एक जागा मविआला मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार यावरून आघाडीत अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही निवडणुकांवर चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये केवळ राज्यसभेच्या जागांवरच नव्हे तर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांवरही चर्चा सुरू आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार असून त्यासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एका उमेदवाराला २९ मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे या ९ पैकी किमान एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, या चर्चांबाबत सध्या तरी काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार यांच्या गटाशी औपचारिक चर्चा केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

शरद पवार पुन्हा राज्यसभेत?

राज्यसभेच्या ज्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये शरद पवार यांची जागाही रिक्त होत आहे. मात्र ते पुन्हा राज्यसभेवर जाणार का, किंवा पक्ष दुसर्‍या नेत्याला संधी देणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

महायुतीला संख्याबळाचा फायदा

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या ७ पैकी सुमारे ६ जागा महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.